मुंबई: महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर तरी मुंबई महापालिका मुख्यालयातील सुरक्षा कडक होईल असे वाटत होते. मात्र यात काही फरक पडलेला नाही. मुख्यालयासह विभाग कार्यालयांत आलिशान गाडीतून येणाऱ्या अभ्यागतांना विना विचारपूस कडक सॅल्यूट मारून प्रवेश दिला जात आहे. उलट जगण्याचे प्रश्न घेऊन येणार्या मुंबईकरांची अडवणूक होत आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयात दुपारी दोन नंतर प्रवेश दिला जातो. यासाठी प्रवेशपत्र बनवणे बंधनकारक आहे. परंतु या प्रवेश पत्रात लिहिलेले अभ्यागताचे नाव व मोबाईल नंबर त्याचाच आहे का ? याची कोणतीही शहानिशा केली जात नाही.
प्रवेश पास घेतल्याशिवाय महापालिकेत कोणालाच प्रवेश नाही. परंतु मुख्यालयाच्या दारात येऊन उभे राहणाऱ्या बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, व अन्य अलिशान गाड्यांमधून येणाऱ्यांना प्रवेश देताना ओळखपत्र विचारले जात नाही. एवढेच काय तर त्यांना कडक सॅल्यूटही मारण्यात येतो.
तर सामान्य नागरिकांना प्रवेश पत्र घेऊन मेटल डिटेक्टर डोरमधूनच प्रवेश करावा लागतो. एवढेच काय तर त्यांच्या बॅगा स्कॅनरमध्ये ठेवाव्या लागतात. विभाग कार्यालयामधील सुरक्षा व्यवस्थेतही मनमानी कारभार सुरू आहे. काही विभाग कार्यालयामध्ये नागरिकांना थेट सोडण्यात येते.
महापालिकेच्या काही विभाग कार्यालयांमध्ये नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेतली जाते. मात्र पालिकेच्या चंदनवाडी सी विभागामध्ये नोंदवही ठेवण्यात आली आहे. पण या नोंदवहीचा सोयीप्रमाणे वापर करण्यात येतो. पत्रकारांनाही नोंदवहीमध्ये आपल्या नावासह मोबाईल नंबरची नोंद करावी लागते.
सभागृह नेत्यांनी व्यक्त केली नाराजी
महापालिका सुरक्षा व्यवस्थेबद्दल पालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनीही नाराजी व्यक्त केली. अलिशान गाडीमधून येणाऱ्यांना सॅल्यूट मारणारे सुरक्षारक्षक नगरसेवकांकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसून येतात. नगरसेवकांपेक्षा अलिशान गाडीतून आलेला व्यक्ती मोठा का, असा सवालच खणकर केला आहे. महापालिकेचे सुरक्षा खाते अकार्यक्षम असल्यामुळे मंत्रालयाच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी ही खणकर यांनी केली आहे.