मुंबई: मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या विस्तारित सहा मजली इमारतीच्या नूतनीकरणावर तब्बल १४ वर्षे काम सुरु होते. अखेर २०२३-२४ मध्ये काम पूर्ण झाले. यासाठी आतापर्यंत १२० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
मात्र काम पूर्ण होऊन काही वर्षे उलटली असतानाच आता या इमारतीच्या विविध दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामांसाठी आणखी ६.८३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
मुंबई महापालिकेची विस्तारित इमारत १९६० साली उभारण्यात आली होती. या इमारतीच्या सर्वंकष दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम २०१४ मध्ये हाती घेण्यात आले होते. शानदार इंटेरिअर प्रा. लि. या कंत्राटदारामार्फत, तर शशी प्रभू अँड असोसिएट्स यांच्या प्रकल्प व्यवस्थापनाखाली हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले.
मात्र आता पुन्हा एकदा इमारतीतील अनेक कामे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नव्याने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामासाठी महेंद्रा रिअल्टर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
या कामांत इमारतीच्या बाह्यभागावरील प्लास्टर आणि स्टोनची दुरुस्ती, जीर्ण झालेले सीआय व जीआय पाइप बदलणे, आझाद मैदानाकडील दगडी भिंतींची स्वच्छता व फ्लश पॉइंटिंग, तळघरातील सुरक्षा कक्ष, युनियन कार्यालय, दूरध्वनी कक्ष आणि पार्किंग परिसरातील संरचनात्मक दुरुस्ती, सर्व मजल्यांवरील मॉड्युलर छताची दुरुस्ती, दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय, तळमजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत महिला व पुरुष स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, गच्चीवरील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती, पंप रुमचे नूतनीकरण, सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या वाहिन्यांची दुरुस्ती, भूमिगत पाण्याच्या टाकीची दुरुस्ती, कँटीनमधील स्थापत्य कामे तसेच अग्निशमन यंत्रणेची उर्वरित कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ६ कोटी ८३ लाख रुपये खर्च करणार आहे.
यापूर्वीच्या नूतनीकरणाच्या करारात अनेक आवश्यक दुरुस्तीची कामे समाविष्टच करण्यात आली नव्हती. त्यामुळे ती कामे प्रलंबित राहिली. सध्या इमारतीच्या उत्तर आणि पश्चिम बाजूच्या भिंतींमधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गळती होत असून अनेक ठिकाणी भिंतींचा रंग निघाला आहे. बुरशी, ओलावा, जलनिरोधक थराचे नुकसान, खराब झालेल्या खिडक्या-दरवाजे तसेच काही विद्युत यंत्रणांची दुरुस्तीही अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.