मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील गैरव्यवहार, कंत्राट वाटपातील गैरप्रकार आणि चेंबूर येथील शाळेच्या बसवर कोसळलेल्या झाड दुर्घटनाप्रकरणी वादग्रस्त ठरलेले उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वीच त्यांनी आपला राजीनामा पालिका प्रशासनाकडे सोपवला आहे. विविध प्रकरणांत सुरू असलेला चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. परदेशी यांनी आपला राजीनामा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठवला असला, तरी तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही.
यंदाच्या पावसाळ्यात झाडे उन्मळून पडून जीवितहानी झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्यानंतर उद्यान विभागाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले गेले. झाडांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या 'ट्री सेंसेस'चा मुद्दा आणि वृक्षांच्या छाटणीतील हलगर्जीपणा प्रकर्षाने समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे.
या समितीची चौकशी सध्या अंतिम टप्प्यात असून, झाडांकडे दुर्लक्ष करणे आणि चुकीचे अहवाल सादर करणे यावरून परदेशी अडचणीत आले असल्याचे समजते. याशिवाय, परदेशी यांच्या जाचाला कंटाळलेल्या उद्यान विभागातीलच काही सहकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला असून, त्याचीही स्वतंत्र चौकशी सुरू आहे.
परदेशी यांच्या अडचणीत वाढ करणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कनिष्ठ वृक्ष अधिकारी दीपाली कौर यांच्यावर दाखवलेली 'विशेष मेहरबानी'. कौर यांच्यासाठी विशेष पद तयार करून त्यांना सलग १० वर्षे एकाच विभागात ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परदेशी यांची उद्यान विभागातून बदली करण्याची शिफारस आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेचे बोरीवली येथील मुख्य प्रशिक्षण केंद्र 'सीटीआरसी' (सिव्हिल ट्रेनिंग रिसर्च सेंटर) किंवा नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'सीएसआर' (पार्टीसीपेट मुंबई) प्रोग्रामच्या विभागात त्यांची रवानगी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.