BMC Evening Fever Clinic pudhari photo
मुंबई

BMC Evening Fever Clinic : पावसाळी आजारांवर 'इव्हनिंग फिव्हर क्लिनिक'

नायर, केईएम, सायन आणि कूपर रुग्णालयांत महापालिकेची सेवा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुनिया आदी साथीच्या आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने प्रमुख रुग्णालयांमध्ये 'इव्हनिंग फिव्हर क्लिनिक' सुरू केले आहे. सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत नागरिकांना तापासह इतर संसर्गजन्य आजारांवरील तपासणी, रक्त चाचण्या आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पालिका प्रशासनाने नायर, केईएम, सायन आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये ही विशेष सेवा सुरू केली असून, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे, उलट्या, जुलाब तसेच डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि चिकुनगुनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार केले जाणार आहेत. आवश्यक रक्त तपासण्यांचे अहवाल अवघ्या दोन तासांत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आजाराचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.

रुग्णांवरील ताण कमी होण्यास मदत

दिवसभर काम करणाऱ्या नागरिकांना कार्यालयीन वेळेनंतरही उपचार घेता यावेत, या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात तापाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ताप दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास किंवा संशयास्पद लक्षणे आढळल्यास तातडीने पालिकेच्या रुग्णालयात तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पालिकेच्या या उपक्रमामुळे पावसाळ्यातील साथीच्या आजारांचे लवकर निदान, वेळेत उपचार आणि रुग्णांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT