Belgaum Japanese Encephalitis case: जपानी ज्वराचा आढळला पहिला रुग्ण

डासांपासून फैलाव, खबरदारी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
Belgaum Japanese Encephalitis case: जपानी ज्वराचा आढळला पहिला रुग्ण
Published on
Updated on

बेळगाव : पावसाळ्याला सुरुवात होत असतानाच, जपानी ज्वराचा एक रुग्ण कित्तूरमध्ये आढळला आहे. सोमवारपेठ परिसरातील एका व्यक्तीला डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यूसारख्याच जपानी एन्सेफलायटीसची लागण झाली आहे. रुग्णावर धारवाड रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सुरुवातीला संबंधित रुग्णाला सामान्य ताप होता. मात्र, गेल्या २० दिवसांत त्याची प्रकृती खालावत गेली आणि तापाचे प्रमाण वाढले. त्यानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर बनून तो कोमात गेला. तातडीने त्याला धारवाड येथील एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्ण दोन दिवसांपूर्वी कोमातून बाहेर आला असला तरी त्याची प्रकृती अद्याप पूर्णपणे स्थिर झालेली नाही. डॉक्टरांनी त्याला पुढील काही दिवस रुग्णालयातच उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णाच्या उपचारासाठी आतापर्यंत सुमारे ५ लाख रुपयांचा खर्च झाला असून दररोज सुमारे २० हजार रुपये खर्च होत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी बंगळूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हा आजार नेमका जपानी एन्सेफलायटीस आहे की अन्य कोणता विषाणूजन्य ताप आहे, याबाबत निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, प्राथमिक लक्षणे आणि वैद्यकीय निरीक्षणांवरून आरोग्य विभागाने जपानी एन्सेफलायटीसची शक्यता व्यक्त केली आहे.

लक्षणे काय?

कित्तूर सरकारी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इमाद राजगोळी म्हणाले, जपानी ज्वर आजारामध्ये तीव्र ताप, हात-पाय व सांध्यांमध्ये वेदना, अशक्तपणा, चक्कर येणे आणि तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे आढळतात. आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास मेंदूवर परिणाम होऊन पक्षाघात, बेशुद्धावस्था किंवा कोमात जाण्याचा धोका संभवतो.

पसरतो कसा?

आजार डासांमार्फत पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. साचलेल्या पाण्यात क्युलेक्स जातीचे डास वाढतात. त्यामुळे घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा तसेच डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

खबरदारीचे आवाहन

तीव्र डोकेदुखी, सततचा ताप, अशक्तपणा किंवा न्यूरोलॉजिकल लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. राजगोळी यांनी केले आहे. तसेच उकळून थंड केलेले पाणी पिणे, गरम व ताजे अन्न सेवन करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news