मुंबई: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर दिवाळी सणानिमित्त ३३ हजार रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) जाहीर करण्यात आला आहे. २०२५ मध्ये ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यावेळी बोनसच्या रकमेत २ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र यामुळे पालिकेच्या तिजोरीवर सव्वातीनशे कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त यंदा २० टक्के म्हणजेच सरासरी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी म्युनिसिपल युनियनने केली होती.
परंतु मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा दीड ते दोन हजार रुपये वाढीव सानुग्रह अनुदान देण्यासाठी प्रशासनाने अनुकूलता दर्शवली होती. याबाबत बुधवारी महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व वरिष्ठ अधिकारी व कामगार संघटनांमध्ये संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते, शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित व विनाअनुदानित) ३३ हजार रुपये, अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित व विनाअनुदानित) ३३ हजार रुपये रुपये बोनस मिळणार आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
एक लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
ही बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे सुमारे एक लाख कर्मचारी व अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एक लाख कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये ९४,७०० महापालिका कर्मचारी व ५००० हून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आरोग्य सेविका व बालवाडी शिक्षिकांना भाऊबीज भेट
मुंबई शहर व उपनगरांत विविध ठिकाणी काम करणाऱ्या आरोग्य स्वयंसेविका यांना १६ हजार रु. तर बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांना ७ हजार रु. भाऊबीज भेट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचीही दिवाळी गोड होणार आहे.
आशा सेविकांना बोनस नाही
महापालिकेच्या आशा सेविका व स्वछ मुंबई प्रबोधन अभियान यातील १५ हजार कामगारांना सानुग्रह अनुदान दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. या विरोधात युनियन औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा कामगार नेते ॲड. प्रकाश देवदास यांनी दिला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा लवकरच निर्णय
पालिका कर्मचार्यांसोबत बेस्ट कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा निर्णय झालाच नाही. कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा, यासाठी कामगार नेते शशांक राव यांनी महापौरांसह पालिका आयुक्तांची भेट घेतली होती. यावेळी महापौरांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी आश्वासन दिले.
कामगार संघटनांकडून निर्णयाचे स्वागत
मुंबई महापालिकेने ३३ हजार रु. बोनस देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कामगार संघटनांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये बोनस मिळावा अशी अपेक्षा होती. परंतु महापालिकेची बेताची आर्थिक परिस्थिती लक्षात येता, मागील वर्षापेक्षा २ हजार रुपये वाढीव बोनस दिल्याबद्दल कामगार नेते रमाकांत बने यांनी समाधान व्यक्त केले. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता कर्मचाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागतच केले आहे.