मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासन तयारीला लागले असताना लोकप्रतिनिधींच्या दिमतीची तयारीही सुरू आहे. नवीन महापौरांसाठी नवीन कार खरेदी केली जाणार आहे. कोणती गाडी हे मात्र गुलदस्त्यात आहे. विविध समिती अध्यक्षांच्या वाहनेही जुनी झाल्याने नवीन खरेदी करण्यात येणार आहेत. निवडणुकीनंतरच खरेदी करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे महापौरांसाठी असलेली वाहने वापरात नसल्यामुळे खराब झाली आहेत. वाहनांमध्ये बिघाड होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन आलिशान गाडी खरेदी करण्यात येणार आहे. या गाडीची किंमत 25 ते 30 लाख रुपये इतकी असू शकते. उपमहापौरांसह स्थायी, सुधार शिक्षण या वैधानिक समित्या व सहा विशेष समित्यांच्या अध्यक्षांना मुंबई महापालिकेतर्फे नवीन वाहन देण्यात येते. या गाडीचा ड्रायव्हरही महापालिकेचा असतो.
प्रभाग समिती अध्यक्ष्यांसाठी मात्र भाडेतत्त्वावर गाड्या घेण्यात येतात. गेल्या चार वर्षापासून समिती अस्तित्वात नसल्यामुळे अध्यक्षही नाहीत. त्यामुळे अध्यक्षांच्या गाड्या अन्य अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी देण्यात आल्या आहेत. या गाड्या आता जुन्या झाल्या असून त्या अध्यक्षांना देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे उपमहापौर व अध्यक्षांसाठी सुमारे 15 लाख रुपयापर्यंत गाडी खरेदी करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर गाडी खरेदीच्या निविदा मागून पहिल्या टप्प्यात महापौर व उपमा पूर्ण नवीन गाडी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महापौरांना देण्यात येणारी गाडी त्यांच्या पदाला साजेशी असेल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महापौरवना नेमकी कोणती गाडी द्यायची याबाबत विविध कंपन्यांच्या गाड्यांचा आढावा घेतला जात आहे. यात टोयोटासह मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा, हुंडाई, होंडा अन्य कंपन्यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रिक गाड्यांना प्राधान्य
महापौरांसह उपमहापौर व अध्यक्षांना इलेक्ट्रिक गाड्या पुरवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. या अगोदरही मुंबई महानगरपालिकेने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक गाडी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे महापौरांसाठी इलेक्ट्रिक अत्याधुनिक गाडी खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अध्यक्षांसाठीही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा विचार महापालिकेचा आहे.