राज-उद्धव एकत्र हवेत, पण प्रभाग गमावण्याची भीती File Photo
मुंबई

BMC Election : राज-उद्धव एकत्र हवेत, पण प्रभाग गमावण्याची भीती

दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले जवळपास एकच असल्यामुळे मनसे अशा बालेकिल्यांतील प्रभागांवर दावा करू शकते

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र हवेत, पण या युतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून बांधलेले प्रभाग गमावण्याची भीती शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांना वाटत आहे. त्यामुळे नगरसेवक बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या इच्छुकांमध्ये प्रभागात सक्रिय राहायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला शह द्यायचा असेल तर, शिवसेना ठाकरे गट व मनसे एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. राज व उद्धव गेल्या काही दिवसांत अनेकदा एकत्रही आले. त्यात गेल्या काही दिवसांपासून राज व उद्धव यांनी एकमेकांच्या विरोधात बोलणेही पूर्णपणे टाळले आहे.

शिवसैनिक व मनसैनिकांनाही दोघे भाऊ एकत्र यावेसे वाटते. मात्र ठाकरे गटाच्या अनेकांना यात प्रभाग गमावण्याची भीती वाटू लागली आहे. दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले जवळपास एकच असल्यामुळे मनसे अशा बालेकिल्यांतील प्रभागांवर दावा करू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून त्या प्रभागातून निवडून येणार्‍या ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला घरी बसावे लागेल.

शहर विभागातील दादर, शिवाजी पार्क, वरळी, शिवडी, लालबाग, काळाचौकी, भायखळा, गिरगाव, ताडदेव या मराठी लोकवस्तीतील प्रभागांवर शिवसेना व मनसे दोघेही दावा करू शकतात. या दाव्यामध्ये शिवसेनेला काही प्रभाग मनसेसाठी सोडणे भाग पडणार आहे. यात गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभागात कार्यरत असलेल्या माजी नगरसेवकांसह अन्य पदाधिकार्‍यांना निवडणुकीपासून लांब राहावे लागेल. त्यामुळे आपल्या प्रभागात काम करायचे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसे खासगीतही त्यांनी बोलून दाखवले आहे. कोणते प्रभाग मनसेला सोडणार याबाबत अद्यापपर्यंत कोणताच निर्णय न झाल्यामुळे नगरसेवक बनू इच्छिणारे सर्वच माजी नगरसेवक व पदाधिकारी सध्या संभ्रम अवस्थेत आहेत.

मनसे कुठे दावा करणार ?

मध्य मुंबईच्या बहुतांश भागात मराठी लोकवस्ती असून यात भायखळा, लालबाग, काळाचौकी, शिवडी, वडाळा, दादर शिवाजी पार्क, वरळी, लोअर परळ, माहीम, माटुंगा, सायन हे विभाग येतात. मुंबई महापालिकेच्या पाच विभाग कार्यालयाच्या हद्दीत हे विभाग येतात. या विभागात 42 प्रभाग असून यात 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे 24 नगरसेवक, तर मनसेचे अवघे 3 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या 24 नगरसेवकांच्या प्रभागांपैकी किमान 10 प्रभागांवर मनसे दावा करू शकते.

यात शिवाजी पार्क, माहीम, शिवडी, माझगाव, लालबाग, भायखळा आदी भागांचा समावेश आहे.हे प्रभाग मनसेला सोडल्यास 2017 मध्ये निवडून आलेल्या 10 माजी नगरसेवकांना घरी बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

मनसेमध्ये मात्र खुशी

शिवसेना ठाकरे गटाबरोबरच्या युतीमुळे मनसेला नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे नगरसेवकाचे स्वप्न पाहणार्‍या मनसेच्या इच्छुकांमध्ये खुशीचे वातावरण आहे. उद्धव-राज दोन्ही भाऊ एकत्र यावेत, यासाठी अनेकांची मनोमन इच्छा आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे निवडून येण्याची खात्रीही वाढली असल्याने मनसेमधील प्रत्येक पदाधिकारी व मनसैनिक होणार्‍या युतीवर खूश असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT