दुबार मतदारांसंदर्भात तयार करण्यात आले विशेष टूल
मतदार कुठे मतदान करणार याची नोंद
मतदार यादीतील तांत्रिक अडचण आता पूर्णपणे सोडवली
Election Commission Press Conference
राज्यातील मुंबईसह २९ महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम आज (दि. १५ डिसेंबर) जाहीर झाला. यावेळी राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मतदार यादीतून नाव वगळणे किंवा नावाचा समावेश करणे याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही, केंद्र सरकारकडे आहे, असेही सांगितले.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ अधिसूची मतदार यादी प्रभागनिहाय करण्यात आली आहे. दुबार मतदार संदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार घरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. मुंबईतील दुबार मतदारांची ओळख केली आहे. येथे ११ लाख दुबार मतदार आहेत. सॉफ्टवेअर टूल तयार केले. त्यानुसार सात टक्के दुबार मतदार आढळले. मतदार कुठे मतदान करणार याची नोंद केली आहे. दुबार मतदार केंद्रावर आल्यास ओळख पटवून हमीपत्र घेतले जाईल. निवडणूक आयोगाने मताधिकार हे मोबाईल ॲप तयार केले आहे. यानुसार प्रभागाचे नाव, केंद्र समजेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेच्या मतदार यादीतील तांत्रिक अडचण (टेक्निकल इश्यू) प्रशासनाने यशस्वीरित्या सोडवली असून, मतदार याद्यांचे प्रिंटआउट आजच (दि. १५) वितरित करण्यात येणार आहेत, असेही वाघमारे यांनी सांगितले. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकावेळी २ टक्के जागांसाठी अपील निघाले, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, पालिकेसंदर्भात असे काही होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अपीलमुळे काही ठिकाणी मुदत पुढे ढकलण्यात आली असली तरी, सर्व निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच होईल, असेही त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांसोबत बैठक : पर्यायी उमेदवारांसंदर्भात तसेच निवडणूक घोषित करण्यापूर्वी राजकीय पक्षांसोबत बैठक घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या दुबार मतदारांसंदर्भात तयार करण्यात आलेले विशेष टूल (Tool) राजकीय पक्षांना दाखवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
२८ महानगरपालिकांसाठी ३ ते ५ मतदार एका प्रभागासाठी द्यावे लागतील. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र ऑनलाइन दाखल करावे लागणार आहे. उमेदवारांना निवड झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. राज्यात एकूण ३ कोटी ४७ लाख मतदार असून, २९ हजार ३४७ निवडणूक केंद्रे आहेत. केवळ बीएमसी (BMC) साठी १० हजार १११ मतदान केंद्रे असतील, असेही वाघमारे यांनी सांगितले.