मुंबई ः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बहुरंगी लढती रंगणार असून भाजप-शिंदे गटाची महायुती विरुद्ध उद्धव ठाकरे गट, मनसे युती यांच्यात तगडी टक्कर होईल, तर काँग्रेस आणि अजित पवार गट हे स्वबळावर लढणार असून हे पक्ष या लढाईत रंगत आणणार आहेत.
उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा झाली असून त्यांचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. मराठीबहुल भागांतील वॉर्डांबाबत चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईसाठी वचननामा असेल. मराठीच्या मुद्द्याबरोबर मुंबईचा विकास यावर भर असेल.
227 वॉर्डांपैकी 170 जागांवर ठाकरे बंधू युती विरुद्ध भाजप-शिंदे गट महायुती असा तगडा संघर्ष होईल. मुस्लिम, दलितबहुल 50च्या आसपास वॉर्डांत काँग्रेस , अजित पवार गट, उद्धव ठाकरे, समाजवादी पार्टी, एमआयएम यांच्यात लढत असेल. त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतात हे महत्त्वाचे असेल. कारण महायुती आणि ठाकरे बंधूंची युती यांनी प्रत्येकी 90 जागा जिंकल्या, तर सत्तेच्या सारीपाटात बाकीचे पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असू शकतात. त्यामुळे या एक-एक जागा महत्त्वाची आहे.
भाजपने माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर कुख्यात दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. अजित पवार गटाने मुंबईची धुरा नवाब मलिक यांच्यावर दिली आहे.त्यामुळे भाजपने महायुतीत घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अजित पवार गट स्वबळावर लढत आहे. पण मुंबईच्या सत्तेसाठी काही नगरसेवकांची गरज लागली तर भाजप अजित पवार गटाची मदत घेणार की धुडकावून लावणार हे गुलदस्त्यात आहे.