मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर शिगेला पोहोचलेला असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एकाच ठिकाणी समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांशी संवाद साधला.
राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन्ही नेते सौहार्दपूर्ण वातावरणात हसतखेळत भेटल्यामुळे, निवडणूक काळात या प्रसंगाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, 30 सेकंदांच्या या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईतील एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान ही भेट घडली. गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन स्टुडिओबाहेर पडत होते. त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे याच कार्यक्रमासाठी मुलाखत देण्याकरिता स्टुडिओच्या दिशेने जात होते. स्टुडिओच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक दोघे समोरासमोर आले. एकमेकांना पाहताच दोघांनीही क्षणभर थांबून अभिवादन केले. यानंतर सुरू झालेली अल्प संवादाची ही भेट अवघ्या काही मिनिटांची असली, तरी तिचे राजकीय पडसाद उमटले.
या भेटीत सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची आवर्जून विचारपूस केली. संजय राऊत हे नुकतेच एका गंभीर आजारातून सावरले असून, काही काळ ते उपचारांसाठी घरीच होते. राऊत आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचे बंधू खासदार सुनील राऊत यांना फोन करून राऊत यांच्या तब्येतीबाबत चौकशी केली होती. त्यानंतर गुरुवारी प्रत्यक्षपणे दोघे समोरासमोर आल्यानंतर शिंदे यांनी राऊतांच्या तब्येतीची चौकशी करत आता तब्येत कशी आहे? अशी आपुलकीने विचारणा केली. यावर संजय राऊत यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केली.
या क्षणिक भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जुजबी संवाद झाला. कोणतीही राजकीय चर्चा किंवा निवडणूकविषयक वक्तव्य टाळत, दोघांनीही केवळ वैयक्तिक पातळीवरील विचारपूस केली. त्यानंतर दोघेही आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले. मात्र, या छोटेखानी भेटीचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.