Varsha Gaikwad on BMC Election 2026
मुंबई : मुंबईतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. "आमचे विजयी नगरसेवक हे २४ कॅरेटचे शुद्ध सोनं आहेत, त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवण्याची आम्हाला गरज भासली नाही," अशा शब्दांत गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, " काँग्रेस पक्षाचे मुंबईत २४ नगरसेवक निवडून आलेले आहेत, ते २४ कॅरेटचं सोनं आहे; त्यामुळे आम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांना ठेवायची गरज पडलेली नाहीये. कुठल्याही ठिकाणी त्यांच्यावरती कुठलाही दबाव चालू शकत नाही आणि खऱ्या सोन्याला काय त्या ठिकाणी बदलता येत नाही. खरं सोनं, खरं सोनंच राहतं."
नगरसेवकांच्या कष्टाचे कौतुक करताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आमच्या कुठल्याही नगरसेवकाचं दबाव आहे, असे तुम्ही ऐकलं का? त्यांना कुठल्याही तऱ्हेने आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं नाही किंवा त्यांच्यावर0 कुठलाही दबाव आहे?. आज सगळेजण स्वइच्छेने येथे आले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, कारण जनतेतून ते निवडून आलेले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून आलेले आहेत. ज्या संघर्षामधून त्यांनी हा विजय मिळवला, हा खरंच त्यांचा खूप खूप मोठा विजय आहे. भाजपमध्ये दडपशाही सुरू आहे, पण आमच्या पक्षात लोकशाही जिवंत आहे."