BMC Election 2026 Pudhari
मुंबई

BMC Election 2026: मुंबईत कोणाची सत्ता येणार? राज-उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार? पहिला सर्व्हे समोर

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील पहिल्या सर्व्हेमध्ये भाजप-शिंदे गटाला आघाडी दाखवण्यात आली आहे. मात्र राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतांचे एकत्रीकरण होण्याची शक्यता आहे.

Rahul Shelke

BMC Election 2026 First Survey: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना राज्यातील राजकारण तापू लागले आहे. देशाची आर्थिक राजधानी कोणाच्या ताब्यात जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एका बाजूला भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महायुती मैदानात आहे, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी करत नवे समीकरण तयार केले आहे.

मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. त्या वेळी शिवसेनेला 84, तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. मात्र गेल्या काही वर्षांत भाजपची मुंबईतील संघटनात्मक ताकद वाढली आहे. त्यामुळे यंदा भाजप सत्तेचा दावा करत असतानाच ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेच्या निकालाबाबत पहिला सर्व्हे समोर आला आहे. ‘व्होट वाईब इंडिया’ या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार सध्याचा मतदानाचा कल पाहता भाजप-शिंदे गटाची आघाडी दिसते, पण ठाकरे बंधूंच्या युतीलाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या सर्व्हेनुसार जर 2024 च्या विधानसभा निवडणुकीसारखाच मतदानाचा पॅटर्न कायम राहिला, तर भाजप आणि शिंदे गटाला मिळून सुमारे 114 जागा मिळू शकतात. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हाच ‘जादुई आकडा’ आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेची युती सुमारे 79 जागांपर्यंत मजल मारू शकते. काँग्रेसला जवळपास 19, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित काही जागा इतर पक्षांकडे जाऊ शकतात.

मुंबईच्या सामाजिक रचनेचा विचार केला तर सुमारे 40 टक्के मराठी, 20 टक्के मुस्लिम आणि उर्वरित 40 टक्के गुजराती, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय मतदार आहेत. कागदावर महायुती मजबूत दिसत असली, तरी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात मुस्लिम मतांचा कल कोणत्या दिशेने जातो, यावरही निकालाचे गणित बदलू शकते.

मागील विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, यावेळी काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्यास ही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. जर ठाकरे युतीला मराठी आणि मुस्लिम मतांचे एकत्रीकरण करण्यात यश आले, तर मुंबई महापालिकेत मोठा बदल घडू शकतो, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

थोडक्यात, पहिला सर्व्हे महायुतीला जास्त जागा दाखवत असला, तरी आगामी काळात उमेदवारांची निवड, प्रचाराची दिशा आणि भावनिक मुद्दे यावरच मुंबईचा अंतिम निकाल ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT