मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुंबई महानगरपालिकेच्या’ (BMC) रणसंग्रामाचे बिगुल वाजले आहे. मात्र, प्रचाराच्या तोफा धडाडण्यापूर्वीच महायुतीमध्ये जागावाटपावरून ठिणगी पडल्याची चर्चा आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवर वर्चस्व राखण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ८० पेक्षा जास्त जागा न देण्याचे भाजपच्या सुकाणू समितीचे मत आहे. यामुळे महायुतीमधील ‘जागावाटपाचा पेच’ अधिक गुंतागुंतीचा होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या सुकाणू समितीने एक अंतर्गत अहवाल तयार केला आहे. या अहवालात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे ‘निवडून येण्याची क्षमता’ असलेले ८० पेक्षा जास्त चांगले उमेदवार नसल्याचे नमूद करण्यात आल्याचे समजते. हा अहवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार आहे.
फडणवीस आणि शिंदे यांच्यात होणाऱ्या बैठकीपूर्वीच हा अहवाल समोर आल्याने जागावाटपाच्या चर्चेत भाजप वरचढ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गट जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही असताना, भाजप या अहवालाचा आधार घेऊन त्यांना कमी जागांवर रोखणार का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जर शिंदे गटाला ८० पेक्षा कमी जागा मिळाल्यास, त्यांच्यासोबत आलेल्या अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कट होऊ शकतात. यामुळे पक्षात बंडाळी माजण्याची भीती शिंदेंच्या शिलेदारांना वाटत आहे. ‘शिवसेना हा मुंबईचा मूळ पक्ष आहे, त्यामुळे आम्हाला सन्मानजनक जागा मिळायला हव्यात,’ अशी भावना शिंदे गटातील नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने ८२ जागा जिंकत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन शिवसेनेला कडवी झुंज दिली होती. आता राज्यातील सत्ता समीकरणे बदलली आहेत. भाजपने मुंबईत ‘मोठा भाऊ’ होण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने स्वतःसाठी १५० जागांचे टार्गेट ठेवले असून, उर्वरित जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये विभागल्या जाण्याची शक्यता आहे.