मुंबई : गिरगावातील राजाराम मोहन रॉय मार्गावरच्या नित्यानंद हॉटेलजवळच्या चौकात सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून एका भल्या मोठ्या लांबलचक चौथऱ्यावर मल्लखांब आणि धातूच्या योग प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. परंतु ज्या ठिकाणी या प्रतिमा उभारण्यात आल्या त्या चौथऱ्याला एका रात्री एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे चौथऱ्याच्या आतून रेती, सिमेंट, विटांऐवजी रॅबिटने भरलेल्या गोण्या बाहेर पडू लागल्या. त्यामुळे कंत्राटदाराने केलेली चोरी या अपघातामुळे उघड झाली.
ही घटना स्थानिक रहिवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ फोटो काढून जतन करत सोशल मीडियावर अपलोड केली. त्यावर गिरगाव परिसराशी जोडलेल्या ताडदेव, ग्रँट रोड खेतवाडी, डोंगरी, उमरखाडी, चिराबाजार परिसरातील नागरिकांनी नानातऱ्हेच्याच्या कमेंट करून मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत रोष व्यक्त करत सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार मिळून जनतेच्या पैशांची सुपर लूट करत असल्याचे आरोप केले आहेत.
महानगरपालिका अधिकाऱ्यांनी तुटलेल्या चौथऱ्याची लागलीच मलमपट्टी करून आपली चोरी लपवण्याचा प्रयत्नही केला .घडलेल्या प्रकाराबाबत शिवसेना शिंदे गट मलबारहिल विधानसभा विभाग प्रमुख प्रवीण कोकाटे यांनी डी विभागात तक्रार दाखल करून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.पण ज्या परिरक्षण खात्याच्या अंतर्गत सुशोभीकरणाचे हे काम झाले आहे त्या खात्याचे प्रमुख अभियंता फाटक यांनी हा भ्रष्टाचार आमच्या काळात झाला नसल्याचे म्हटले आहे.
योगा मल्लखांबच्या प्रतिमेखाली असलेल्या चौथ्याऱ्यात काय भरायचं होत हे तुम्हाला माहित आहे का, असा उलट प्रश्न फाटक यांनी तक्रारकर्त्यांना विचारून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुशोभीकरणाचे कंत्राट डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्यामुळे त्या चौथऱ्यात रेती सिमेंटच्या नावाखाली रॅबिटच्या गोणी भरून लाखो रुपयांचा मलिदा खाण्याचे काम मात्र महानगरपालिका अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप प्रवीण कोकाटे यांनी केला आहे.
ज्या महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली सुशोभीकरणाचे काम झाले आहे ते मात्र आजही परिरक्षण खात्यात एकावर एक घोटाळे करत सुटले आहेत. कारवाई टाळण्यासाठीच अभियंता फाटक उडवाउडवीची उतरे देत असल्याचे दिसून आले.
जनतेच्या पैशांची लूट
सुशोभीकरणाच्या कामात लाखो करोडो रुपयांचा घोटाळा करूनसुद्धा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना पाठीशी का घातले जात आहे, असा प्रश्न शिंदे गटाच्या विभाग प्रमुखांनी उपस्थित केला आहे.ही तर सरळ सरळ जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप कोकाटे यांनी डी विभागावर केला आहे.