BMC  Pudhari Photo
मुंबई

Mumbai civic hall : टाऊन हॉलचा प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता

जिमखान्याच्या जागी पालिका सभागृहासाठी चाचपणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई :मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानालगत असलेल्या पालिकेच्या कामगारांच्या जिमखान्याच्या जागी मुंबई महापालिका सभागृह बांधण्यासाठी लवकरच चाचपणी करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे उभारण्यात येणाऱ्या टाऊन हॉलचा प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक सभागृह नगरसेवकांसाठी अपुरे पडत असल्यामुळे नवीन सभागृहाची मागणी भाजपाने लावून धरले आहे. महापालिका मुख्यालयात असलेल्या सभागृहाचा विस्तार करणे शक्य नाही. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन सभागृह उभारणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे भाजपाने मुख्यालयासमोरील एकमेव जागा असलेल्या जिमखान्याच्या ठिकाणी टाऊन हॉल न उभारता त्या ठिकाणी नवीन सभागृह उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजपाने ही मागणी केल्यामुळे टाऊन हॉलचा प्रस्ताव मागे घेऊन देण्यात आलेले कंत्राट रद्द केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या टाऊन हॉलचा प्रस्ताव मागील तीन आठवड्यांपासून स्थगित ठेवण्यात आला आहे.

दरम्यान जिमखान्याच्या ठिकाणी महापालिका सभागृह उभारायचे झाल्यास ती जागा पुरेशी आहे का, याची महापालिका प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येणार आहे. महापालिका सभागृह उभारल्यानंतर पुढील 50 वर्षांचा विचार करून त्यामध्ये किमान 400 पेक्षा जास्त आसनव्यवस्था असणे आवश्यक आहे. यात नगरसेवकांसाठी किमान 300 आसने राखीव ठेवण्यासह अधिकारी व पत्रकारांसाठी प्रत्येकी 50 आसने आरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

त्याशिवाय सभागृहातबाहेर महापौर उपमहापौरांसह प्रमुख समिती अध्यक्षसाठी स्वतंत्र दालन, सचिव विभागाचे कार्यालय, उपाहारगृह ठेवावे लागणार आहे. याचा आढावा घेऊन सध्याची जिमखान्याची जागा महापालिका सभागृहासाठी पुरेशी आहे की नाही, याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सभागृहासाठी राज्य सरकारकडूनही ग्रीन सिग्नल

देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार सांभाळणाऱ्या मुंबई महापालिकेचे सभागृह अपुरे पडत असल्यामुळे नवीन सभागृह उभारण्यासाठी राज्य सरकारकडूनही ग्रीन सिग्नल असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभागृहाच्या अपुऱ्या जागे संदर्भात सांगण्यात आले आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री टाऊन हॉलचा प्रस्ताव रद्द करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना देतील, असे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT