मालाड : मालाड (प.) व्यासवाडी परिसरातील मढ जेट्टी रोडवर बांधलेल्या बेकायदेशीर आरसीसी बंगल्याविरोधात अखेर महापालिका पी/उत्तर विभागाने हातोडा चालवला. परवानगीशिवाय मोकळ्या जागेवर बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यानंतर महापालिकेने महिनाभरापूर्वीच काम थांबवण्याची नोटीस बजावली होती. मात्र, बांधकाम सुरूच ठेवल्याने गुरुवारी महापालिकेने कारवाई केली.
सदर ठिकाणी राजकीय नावे असलेले बॅनर लावून महापालिकेची कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ व पोर्स्ट्स फिरत होते. परिसरात दबावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तरीही महापालिकेने दुसरी तपासणी करून नियमाच्या उल्लंघनाची खात्री करून घेतली. त्यानंतर 24 तासांची मुदत देऊन अखेरीस बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. पथकात सहाय्यक अभियंता राजेश सोनवणे, उपअभियंता सुहास घोलप आणि कनिष्ठ अभियंता कृष्णा बडे यांचा समावेश होता.
परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम खपवून घेतले जाणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांबाबत आणखी कठोर पावले उचलली जातील, असा इशारा यावेळी सहाय्यक महापालिका आयुक्त कुंदन वळवी यांनी दिला.
स्थानिकांकडून महापालिकेच्या तत्परतेचे स्वागत करण्यात येत असून, या कारवाईमुळे मढ परिसरातील बेकायदेशीर बांधकामदारांना चांगलाच धडा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.