मुंबई : प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केल्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करीत मुंबईत 1020 बांधकामस्थळी सेन्सर, 106 टँकरने फवारणी, तर 67.86 टन धूळ झाडल्याची माहिती मा. न्यायालयाला दिली.
दिल्लीपाठोपाठ मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात 500 मीटरच्या पुढे दिसेनासे झाले आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने गुरुवारी चिंता व्यक्त केली होती.त्यानुसार शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
यावेळी पालिकेच्या पर्यावरण आणि हवामान विभागाचे मुख्य अभियंता अविनाश काटे यांच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. मुंबईत 1954 बांधकाम साईट्स सुरू असून 1020 साईट्सवर लो कॉस्ट सेन्सर बसवण्यात आले आहेत. 397 सेन्सर बसवण्याचे काम सुरू आहे. धुळीने प्रदूषण वाढू नये म्हणून पालिकेने 106 टँकरच्या साहाय्याने गेल्या दोन महिन्यांत मुंबईच्या 24 वॉर्डमधील 1518.35 किमी रस्त्यांवर पाणी शिंपडले, तर यंत्राच्या साहाय्याने 67.86 टन धूळ साफ केली आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या वकिलांना मदत म्हणून प्रत्येकी दीड लाख रुपयांची तरतूद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले व सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.