BMC Redevelopment Scam Bandra
मालाड : मुंबई महानगरपालिकेत तब्बल 80 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याचा भलामोठा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात महापालिकेचे सहायक आयुक्त महेश सुभाष पाटील यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एका बॉलिवूड अभिनेत्याचे नावही समोर येत आहे. या खुलाशामुळे पालिकेतील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
यूकेमध्ये राहणारे भारतीय वंशाचे उद्योगपती निशित पटेल यांनी या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. बांद्रा येथील एका पुनर्विकास प्रकल्पात प्राधान्याने घरे देण्याचे आश्वासन देत पाटील आणि त्यांच्या ओळखीतील व्यक्तींनी डिजिटल आणि रोख स्वरूपात पैसे उकळल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.
यातील पटेल यांच्याकडूनच जवळपास 60 कोटी रुपये दबाव टाकून घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. धमक्या, दबाव, व्यवहारांचे पुरावे, दस्तऐवज आणि व्हिडिओ स्वरूपात त्यांनी पोलिसांकडे पुरावे सादर केले असल्याचे समजते. मात्र याबाबत पोलिसांकडून काहीही माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, वरिष्ठ स्तरावरूनही या प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे. घोटाळ्याचे स्वरूप मोठे असल्यामुळे, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना महेश पाटील यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून सांगितले की, सर्व आरोप खोटे, बनावट आणि निराधार आहेत. माझी बदनामी करण्याचा कट असून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मारहाण झाल्याचा निशीत पटेल यांचा आरोप
महापालिकेचे सहायक आयुक्त महेश सुभाष पाटील यांच्या सांगण्यावरुन 4 ऑक्टोंबरला आपल्याला दोन बाऊसन्सरनी मारहाण झाल्याचा आरोप निशीत पटेल यांनी केला आहे. यावेळी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडे साठ कोटींची मागणी करण्यात आली. तसेच ही रक्कम न दिल्यास त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसह मुंबई पोलीस आणि पालिका आयुक्तांना लेखी तक्रार करुन या संपूर्ण प्रकणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.