रक्तातील लक्षणे सांगतील मधुमेह वाढण्याचा धोका pudhari photo
मुंबई

Blood symptoms indicate diabetes risk : रक्तातील लक्षणे सांगतील मधुमेह वाढण्याचा धोका

आयआयटीतील संशोधनामुळे उपचारपद्धती ठरवता येणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आयआयटी मुंबई आणि हैदराबादच्या उस्मानिया मेडिकल कॉलेजमधील संशोधकांनी केलेल्या एका नव्या संशोधनातून मधुमेही रुग्णांमध्ये होणाऱ्या मूत्रपिंडाच्या गुंतागुंतींची पूर्वसूचना रक्तातील सूक्ष्म घटकांद्वारे (मेटाबोलाईट्स) मिळू शकते, असा निष्कर्ष काढला आहे. ‌‘मेटाबोलॉमिक्स‌’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या अभ्यासामुळे भविष्यात रुग्णांच्या शरीर रचनेनुसार आणि चयापचयानुसार वैयक्तिक उपचारपद्धती ठरवणे आता शक्य होणार आहे.

भारताला ‌‘डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड‌’ म्हटले जाते. तब्बल 10 कोटी भारतीय मधुमेहाने ग्रस्त असून आणखी 13 कोटी जण ‌‘प्री-डायबेटिक‌’ अवस्थेत आहेत. या आजारामुळे हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होतात. जवळपास एक तृतीयांश रुग्णांमध्ये दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (क्रॉनिक किडनी डिसीज) दिसून येतो.

या पार्श्वभूमीवर यावर नियंत्रण आणि पूर्वसूचना कळाव्यात यासाठी प्रा. प्रमोद वांगीकर (आयआयटी मुंबई) आणि डॉ. राकेश कुमार सहाय, डॉ. मनीषा सहाय (उस्मानिया मेडिकल कॉलेज) यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी 52 स्वयंसेवकांच्या संपूर्ण रक्ताचे विश्लेषण केले. या अभ्यासाचे निष्कर्ष ‌‘जर्नल ऑफ प्रोटीओम रिसर्च‌’ मध्ये जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

संशोधकांनी सुमारे 300 जैवरासायनिक घटकांचे (मेटाबोलाईट्स) परीक्षण केले आणि त्यापैकी 26 घटक निरोगी व मधुमेही व्यक्तींमध्ये ठळक फरक दाखवणारे असल्याचे आढळले. यात व्हॅलेरोबेटाइन, रायबोथायमिडीन आणि फ्रुक्टोसिल-पायरोग्लुटामेट यांसारखे काही घटक यापूर्वी मधुमेहाशी संबंधित मानले गेले नव्हते. “मधुमेह म्हणजे फक्त साखरेची वाढ नव्हे, तर शरीरातील चरबी, अमायनो आम्ले आणि इतर जैवरासायनिक प्रक्रिया विस्कळीत होतात,” असे प्रा. प्रमोद वांगीकर यांनी सांगितले.

याशिवाय, संशोधकांनी सात अशा रेणूंचीही ओळख केली ज्यांच्या पातळीतील बदलांवरून मूत्रपिंड विकाराचा धोका आधीच समजू शकतो. या सूचकांमुळे क्रिएटिनिन किंवा ईजीएफआर चाचण्यांपूर्वीच मूत्रपिंड बिघाडाचा अंदाज घेता येईल, असे संशोधक स्नेहा राणा यांनी सांगितले.

  • भारतात मधुमेहासाठी सर्वांसाठी एकसारखे उपचार पद्धती वापरली जाते. पण या अभ्यासामुळे प्रत्येक रुग्णाच्या शरीरानुसार उपचार ठरवणे शक्य होईल, असे डॉ. राकेश सहाय यांनी स्पष्ट केले. या संशोधनाला कोईता सेंटर फॉर डिजिटल हेल्थ, आयआयटी मुंबई आणि भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा निधी मिळाला असल्याचेही संशोधकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT