BKC Railway Connectivity Pudhari
मुंबई

BKC Railway Connectivity: बीकेसीसाठी मोठी योजना; कुर्ला-सायन-चुनाभट्टीला जोडणारे पूल, नव्या रेल्वे स्थानकाचीही चर्चा

बीकेसीच्या वाहतुकीवर चर्चा करताना एका जेन झी तरुणाने ही अभ्यासपूर्वक कल्पना सुचवली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कार्यालयीन कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी, नेहमीची वाहुतक कोंडी, त्यात बेस्ट बसचा बेभरोसा आणि रिक्षा-टॅक्सी चालकांचा मनःस्ताप अशा अनेक गोष्टीना दररोज तोंड देत मुंबईकरांना वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सचा प्रवास करावा लागत आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सची सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गातील सायन आणि कुर्ला दरम्यान 'बीकेसी रोड' नावाचे नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशन बांधण्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहे.

बीकेसीच्या वाहतुकीवर चर्चा करताना एका जेन झी तरुणाने ही अभ्यासपूर्वक कल्पना सुचवली आहे. त्याचा विचार झाल्यास बीकेसीत ये-जा करणाऱ्या लाखो मुंबईकरांचा दररोजचा प्रवास अधिक सुलभ होईल, अशी चर्चा आहे.

मुंबईतील मध्यवर्ती आणि सदैव वर्दळ असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)ची सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी दीर्घकालीन उपाय शोधले जात आहेत.

अशात रेल्वे आणि प्रवासी वाहुतकीच्या अभ्यासाची आवड असलेल्या वीरेश नारकर याने कुर्ला, सायन आणि बीकेसीचा अभ्यास करून 'बीकेसी रोड' नावाचे एक नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशन सुचवलेे आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सायन आणि कुर्ला उपनगरीय रेल्वे स्टेशन दरम्यान हे नवे स्थानक उभारले जाऊ शकते. जेणे करून दररोज बीकेसीत प्रवास करणाऱ्या लाखो कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल, असा दावा नारकरचा आहे. हॉंगकॉंग आणि शेंझेन येथील पादचारी वाहतुकीचे दाखले नारकरने दिले आहेत. त्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले.

बीकेसी परिसर सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे. हजारो प्रवासी या दोन स्थानकांवरून बीकेसीत येतात. मात्र सायन आणि कुर्ला स्टेशनवरून येणारे रस्ते प्रचंड गुंतागुंतीचे आहेत. अवैध फेरीवाले आणि गर्दीने व्यापलेल्या निमुळत्या गल्ल्या, रस्ते आणि रिक्षा टँक्सी चालकांचे मनमानी भाडे अशा अनेक गोष्टीचा त्रास येथे आहे.

तेव्हा मुंबईत एका प्रकल्पासाठी ट्रॅव्हलेटर बसवले जात आहेत, तसेच ट्रॅव्हलेटर असलेला पादचारी पूल प्रवाशांना बीकेसीला अगदी कमी वेळात पोहोचवू शकतो. सायन येथे रूळ बदलण्याचे काम सुरू आहे.

अशात सायन आणि कुर्ला दरम्यान एक नवीन स्थानक तयार करून ट्रॅव्हलेटरने बीकेसीला जोडता येईल. ज्यामुळे कुर्ला स्टेशन, बस आणि ऑटो-रिक्षांवरील अवलंबित्व कमी होईल, अशा कल्पना वीरेश नारकर यांनी सुचविलेल्या आहेत.

रेल्वेसाठी एक खर्चिक प्रकल्प

पश्चिम रेल्वे मार्गात बीकेसी परिसर लांब आहे. मध्य रेल्वे मार्गात कुर्ला-सायन स्थानके बीकेसी जवळ आहेत. मात्र याच मार्गात सर्वाधिक रेल्वे फेऱ्या,अनेक मुख्य मार्ग,हार्बर लाईन,मिठी नदी पूल अशी गुंतागुंतीची ट्रॅक रचना आहे. त्यामुळे नियमित रेल्वे वाहतुकीत व्यत्यय न आणता नवीन प्लॅटफॉर्मसाठी जागा शोधणे हे एक मोठे अभियांत्रिकी आव्हान आणि एक खर्चिक प्रकल्प असल्याचे रेल्वेतील तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञांकडून विविध चर्चा

दोन वर्षांपूर्वी बीकेसीला कुर्ला, सायन आणि चुनाभट्टीशी जोडण्यासाठी काही महत्त्वाचे पादचारी पूल बांधण्याची सूचना करण्यात आली होती असे 'वॉकिंग प्रोजेक्ट'चे म्हणणे आहे. तसेच वांद्रे आणि कुर्ला स्थानकांना उपनगरीय रेल्वेमार्गे जोडण्याची योजना शासनाची होती. बीकेसी स्थानक ही उत्तम कल्पना असल्याचे प्रा. डॉ. जालिंदर अडसूळ यांनी सांगितले. दरम्यान, बीकेसी सध्या विकासाच्या मार्गावर आहे. अनेक बांधकामांसाठी जमीन कब्जा केली जात असताना बीकेसी नवीन ट्रेन जागा निर्माण करण्याची हीच वेळ असल्याचेही म्हटले जाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT