BMC Election 2026 Seat Sharing: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होत्या. या चर्चांमधून आता महायुतीचा संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. माहितीनुसार, 227 जागांच्या मुंबई महापालिकेत भाजप सुमारे 140 जागांवर तर शिंदे गटाची शिवसेना 87 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्रपणे उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत मिळूनच सर्व 227 जागांची विभागणी होणार आहे. मात्र, या फॉर्म्युलावर अधिकृत शिक्का कधी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सुरुवातीला झालेल्या बैठकीत भाजपकडून शिंदे गटासाठी केवळ 52 जागा सोडण्याचा विचार होता. पण राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण बदलले. त्यानंतर भाजपने शिंदे सेनेला अधिक जागा देण्याची तयारी दर्शवली, अशी चर्चा आहे. त्यामुळे अंतिम आकड्यांवर अजूनही चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजपने अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पनवेल या महत्त्वाच्या शहरांमध्येही जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. मात्र, लवकरच या सर्व जागांचा फॉर्म्युला ठरेल, असा दावा पक्षातील सूत्रांकडून केला जात आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 227 प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. महापालिकेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.