Rahul Gandhi White T-Shirt : 
मुंबई

ज्याचे बोट धरून राज्यात वाढले, त्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नाना पटोले

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ज्या शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात भाजपा वाढली त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवून केंद्रातील मोदी सरकार कारभार करत असून ईडी (ED), सीबीआय (CBI), इन्कम टॅक्स या सहका-यांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सत्तापिपासू भारतीय जनता पार्टीला नैतिकता राहिली नाही. कोणत्याही मार्गाने सत्ता हस्तगत करणे हा एकमेव उद्देश आहे. सर्वसामान्य जनता त्यांचे प्रश्न याच्याशी भाजपला काहीही देणेघेणे नसून सत्तेच्या आसुरी महात्वाकांक्षेपायी भाजपने देशाचे वाट्टोळे करायला सुरुवात केली आहे. ज्या ज्या मित्रपक्षांचा हात धरून भाजप वाढला आहे, त्याच पक्षांना संपवण्याचे काम भाजपने केले आहे. बहुजन समाज पार्टी, लोकजन शक्ती पक्ष, मुकेश साहनी यांचा व्हीआयपी पक्ष यासारख्या अनेक मित्रपक्षांना संपवले. अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक नंतर आता महाराष्ट्रातही त्यांनी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा वापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण, काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले, पीडीपी सारख्या पक्षासोबत युती करून सत्तेची फळं खाणारा भारतीय जनता पक्ष आता इतरांना हिंदुत्वाचे सर्टीफिकेट वाटतो आहे, हा मोठा विनोद आहे. भाजपला हिंदू आणि हिंदुत्वाचे काही देणे घेणे नसून त्यांना फक्त सत्ता आणि सत्तेतून मिळणा-या मलिद्याचा हव्यास आहे. भाजपने रामाच्या नावाने गोरगरीब जनतेकडून पैसा जमा केला आणि त्याचा हिशोब अद्याप दिला नाही. भाजपच्या मुखात रामाचे नाव असले तरी त्यांच्या मनात मात्र सत्तापिपासू राक्षसी वृत्तीच आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT