Ajit Pawar challenges | मंत्र्यांच्या कारनाम्यांनी अजित पवार घायकुतीस File Photo
मुंबई

Maharashtra Municipal Election: भाजपाकडून अजित पवार यांची प्रचारात कोंडी

प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांची आघाडी; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे येथेही दुसरे स्थान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीप्रमाणे राज्यातील 29 महानगरपालिकांच्या प्रचारात भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची कोंडी केली. त्यांना पुणे आणि पिंपरी - चिंचवड या दोन महानगरपालिकांच्या क्षेत्रात खिळवून ठेवण्यात भाजपा यशस्वी झाला.

सर्वाधिक सभा आणि रोड शोच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पहिले स्थान पटकविले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुसऱ्या स्थानावर राहीले. विशेष म्हणजे कोणत्याही निवडणुकांमध्ये महाराष्ट्र पिंजून काढणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या निवडणूक प्रचारांपासून दूर राहिले.

राज्यात 29 महानगरपालिकांच्या प्रचार सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी धडाकेबाज प्रचार सुरू करत पक्ष आणि उमेदवारांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. 3 ते 13 जानेवारी या कालावधीत त्यांच्या विविध महापालिका क्षेत्रात त्यांचे प्रचाराचे 77 इव्हेन्ट झाले. त्यामध्ये 37 सभा आणि रोड शो चा समावेश आहे.

फडणवीस यांच्या मुंबईमुंबईत 7 ठिकाणी सभा झाल्या. तर नागपूर 5, पुणे 2 व सांगली, अकोला, जालना, परभणी, नांदेड, धुळे, लातूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, अहिल्यानगर, वसई विरार, मिरा भाईंदर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, नवी मुंबई येथे प्रत्येकी एक सभा झाली. तर इचलकरंजी, चंद्रपूर, अमरावती, जळगांव, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये रोड शो झाले. याशिवाय ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपुर, पुणे, कोल्हापूर आणि पनवेलमध्ये विशेष तर विविध 33 वाहिन्यांना मुलाखती दिल्या.

प्रचार सभा, रोड शो आणि शिवसेना शाखांना दिलेल्या भेटींची संख्या पाहता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपले बहुतांश लक्ष मुंबईवर केंद्रित केले होते. ठाणे या आपल्या होम पीचची जबाबदारी त्यांनी अप्रत्यक्ष अन्य नेत्यांवर सोपवून त्यांनी आपला प्रचाराचा वेळ मुंबईसाठीच दिला. 29 पैकी अमरावती, अकोला, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील 10 प्रचार सभा वगळता उर्वरित सभा आणि रोडशो त्यांनी मुंबई तेच घेतले. 25 ठिकाणी रोडशो आणि 14 ठिकाणी शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनीही वाहिन्यांना मुलाखती दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक प्रचारात उतरल्यास काही महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांचा अधिकचा आकडा गाठू शकतील, अशी शक्यता वाटल्यामुळे त्यांना पुणे आणि पिंपरी- चिंचवड मध्येच खेळवून ठेवण्यात भाजपाची रणनीती यशस्वी झाली, असे पवार यांच्या प्रचार सभांच्या संख्येवरून वाटत आहे. एकदोन ठिकाणचा अपवाद वगळता अजित पवार पुण्यातून बाहेर पडलेच नाहीत.

शरद पवार हे आपल्या पक्षाची सद्यस्थिती ओळखून प्रचारात उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.मात्र, महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचारापासून ते दूर राहिले. त्यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील हे सांगलीतच ठाण मांडून बसले. तर जितेंद्र आव्हाड हे सुद्धा ठाण्याच्या बाहेर फिरले नाहीत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नाशिक, मुंबईतील सभा लक्षवेधी ठरल्या. परंतु या बंधुनी इतर महानगरपालिकांच्या प्रचाराकडे जणू दुर्लक्ष केले होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील सर्व महापालिका निवडणुकांमध्ये सुमारे 35 ठिकाणी प्रचार सभा घेतल्या, तर सुमारे 25 ते 30 प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT