Sanjay Raut India Pakistan Asia Cup Match :
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्यावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांनी याच दिवशी आम्ही रस्त्यावर उतरणार आणि माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवणार असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी संजय राऊत यांनी माझा जावेद माझी बिर्याणी ही मोहीम राबवावी असा टोला लागवला.
संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावेळी शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगितलं.
याचबोबर त्यांनी आम्ही माझं कुंकू माझा देश हे आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. पंतप्रधान महिलांना सिंदूर पाठवतील. ते अभियान सुद्धा आम्ही राबवणार आहोत. ऑपरेशन सिंदूर अजून संपलं नाही असं सरकारनं सांगितलंय. त्यात भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना खेळण्याचा आमचा पक्ष निषेध करणार आहे. हा देशद्रोहच आहे अशी टीका देखील राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.
या टीकेवर आता भाजपकडून प्रत्युत्तर आलं आहे. संजय राऊतांची पत्रकार परिषद संपल्या संपल्या भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर टिका केली. ते म्हणाले, “राऊतांनी ‘माझं कुंकू माझा देश’ अभियानाची घोषणा केली आहे. पण देशप्रेमाचं हे ढोंग करणं योग्य नाही. कारण जेव्हा लोकसभा निवडणुका होत्या तेव्हा त्यांच्या मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले, हिरवे गुलाल उधळले गेले, दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेले लोक त्यांच्या प्रचारासाठी आले. तेव्हा देश आठवला नाही का. आज मात्र क्रिकेट सामन्यावरून अचानक देशप्रेम आठवतंय. त्यामुळे तुम्हाला ‘माझं कुंकू माझा देश’ नव्हे तर ‘माझा जावेद, माझी बिर्याणी’ असं अभियान चालवावं लागेल.”
नवनाथ बन पुढे म्हणाले, “राऊत पाकिस्तानसारखीच भाषा बोलतात. पाकिस्तान म्हणतं की ऑपरेशन सिंदूरमधले दहशतवादी जिवंत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या भारतीय जवानांनी त्यांचा पूर्णतः खात्मा केला. एकाही दहशतवाद्याला जिवंत सोडलं नाही. तरीदेखील राऊत पाकिस्तानच्या भाषेत बोलून देशाला गोंधळात टाकतात. पाकिस्तान ज्या पद्धतीने रडगाणं गातं, त्याच प्रकारची रुदाली भाषा राऊत वापरतात.”