मुंबई ः प्रदेश भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मूक मोर्चात बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. pudhari photo
मुंबई

BJP silent protest : विरोधकांच्या मोर्चाविरोधात भाजपचे मूक आंदोलन

मविआचा कट उधळून लावा : रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

मतचोरी आणि मतदार यादीतील घोळाच्या विरोधात निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी मनसेसह महाविकास आघाडीने शनिवारी ‌‘सत्याचा मोर्चा‌’ काढला. दुसरीकडे या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आघाडीच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी गिरगाव चौपाटी येथे मूक आंदोलन केले. त्यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. यावेळी भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ, आमदार योगेश सागर, विद्या ठाकूर, संजय उपाध्याय यांच्यासह अनेक नेते मंडळी या मूक आंदोलनात सहभागी झाले होते.

प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुती सरकार झोकून काम करत असताना महाविकास आघाडी राज्यात अराजक माजवून पिछाडीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. परदेशी शक्ती आणि फंडिंगच्या मदतीने पोसणाऱ्या सामाजिक संस्थांना हाताशी घेऊन विकास रोखण्याचे आणि दिशाभूल करून अस्थिरता निर्माण करण्याचे काम ही मंडळी करत आहेत, असा आरोप करत या आंदोलन करणाऱ्यांमध्ये एखादा सचिन वाझे देखील असू शकतो, असा सावधानतेचा इशारा देत जनतेने डोळसपणे यांचा कुटिल उद्देश, डाव समजावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्राला सर्वात वाईट दिवस ठाकरे बंधूंनी दाखवले

ठाकरे बंधू वक्तृत्वशैलीच्या बळावर जनतेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरून भावनिक आवाहनांमध्ये अडकवून त्यांची दिशाभूल करत आले आहेत. महाराष्ट्राला सर्वात वाईट दिवस ठाकरे बंधूंनी दाखवले, असा आरोप करत प्रत्येक गरिबाला हक्काचे घर मिळायला हवे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून साकार होत आहे. फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्राची वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत आहे, असेही चव्हाण म्हणाले.

3 आमदारांच्या मतदारसंघात 5 हजार बांगला देशी : मंगलप्रभात लोढा

मतदार याद्या तपासून त्या पारदर्शक करण्याच्या महाविकास आघाडीच्या मागणीला आपले पूर्ण समर्थन असल्याचे सांगताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, याकूब मेमनची फाशीची शिक्षा रद्द करावी, या मागणीसाठी अस्लम शेख, अमिन पटेल आणि अबू आझमी या तीन महापुरुषांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते. पण या तीन आमदारांच्या मतदार संघातील मतदार याद्या तपासल्यास किमान पाच हजार बांगलादेशी रोहिंगे सापडतील. जर हे खोटे निघाले तर मी राजीनामा देईन आणि सापडले तर या तिघांनी राजीनामा द्यावा, असे थेट आव्हान लोढा यांनी दिले. यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाला पत्र लिहून या तीन आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या तपासण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबईत आता याकूब मेमन पॅटर्न चालणार नाही. ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, भगव्या झेंड्याची आहे. इथे फडणवीस पॅटर्नच चालणार, असेही लोढा म्हणाले.

सत्याच्या नावाखाली असत्याचा तमाशा : साटम

मतदार आपल्याला का नाकारत आहेत याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी आघाडीच्या नेत्यांनी मोर्चाच्या माध्यमातून असत्याचा तमाशा लावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी आघाडीला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी म्हणजे हा मोर्चा आहे, अशी खिल्ली मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उडवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT