तूर्त युद्धविराम; फडणवीस ‌‘वर्षा‌’वर, शिंदे दिल्लीत  pudhari photo
मुंबई

BJP Shinde Sena conflict : तूर्त युद्धविराम; फडणवीस ‌‘वर्षा‌’वर, शिंदे दिल्लीत

धुसफूस शमणार की वाढणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत तूर्त युद्धविराम लागू आहे. एकमेकांचे माजी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश द्यायचा नाही, दोन्ही पक्षांनी हे पथ्य पाळायचे, या अटीवर दोन्ही पक्षांतील संघर्ष थांबला आहे. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीचा मुहूर्त साधत शिंदे गटाच्या मंत्र्यांचे बहिष्कारअस्त्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमक पवित्र्याने बारगळले होते. त्यानंतर बुधवारी दोन्ही पक्षांच्या आघाडीवर शांतता होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभर ‌‘वर्षा‌’ निवासस्थानी गाठीभेटी आणि बैठकांत व्यस्त होते. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळी राजधानी दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे महायुतीतील युद्धविराम किती काळ लागू राहणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निमित्ताने एकमेकांचे माजी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मंगळवारी भडका उडाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यासह शिंदे गटातील माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना भाजप आपल्या पक्षात घेत असल्याने मंत्रिमंडळ बैठकीलाच दांडी मारत शिवसेना मंत्र्यांनी आपली नाराजी उघड केली.

मात्र, मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपल्या नाराजीसह गाऱ्हाणे घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात पोहोचलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलेच सुनावले. प्रवेश देण्याची सुरुवात कोणी केली? असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना उल्हासनगरमधील ‌‘ऑपरेशन टायगर‌’ची आठवण करून दिली. त्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांचे बहिष्कारअस्त्रच निकामी झाले. मात्र, त्याचवेळी दोन्ही बाजूंनी यापुढे एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश न देण्याचे, तसेच कसोशीने हे पथ्य पाळण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावर शिंदे गटानेही होकार भरला.

पक्ष प्रवेशांचे तुरळक कार्यक्रम

या तहामुळे बुधवारी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला नाही. एरव्ही प्रवेशाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेश कार्यालय ओसंडून वाहत असते. बुधवारी तिथे प्रवेशाची गर्दी नव्हती. शिंदे गटाच्या बाळासाहेब भवनातही शांतता होती. अपवाद म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही पक्ष प्रवेश दिले. मात्र, यात कोणतेही मोठे नाव अथवा भाजपशी संबंधित नसतील याची काळजी घेतली गेली. त्यांनतर उपमुख्यमंत्री शिंदे हे सायंकाळी राजधानी दिल्लीसाठी रवाना झाले.

भाजप श्रेष्ठींची भेट घेण्यासाठी शिंदेंचा हा दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात महायुतीतील घडामोडी शिंदे यांच्याकडून भाजप श्रेष्ठींच्या कानावर घातल्या जाण्याची शक्यता आहे. विशेषतः, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीत घेतलेली भूमिका शिंदे गटाला मंजूर नाही. हा विषय दिल्ली दरबारी पुन्हा एकदा मांडला जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची खलबते

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत भारतीय न्यायसंहितेनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. याशिवाय अन्य कोणताही कार्यक्रम त्यांच्या दैनंदिन पत्रिकेत दर्शविण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही या कार्यक्रमाला होते. उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर राहिले. भारतीय न्यायसंहितेवरील राज्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता. शिवाय, एकनाथ शिंदे हे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे मानले जात होते. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमानंतर ‌‘वर्षा‌’ बंगला गाठत दिवसभर गाठीभेटी घेऊन खलबते केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT