मुंबई : मुंबई, ठाण्यात युती करण्यावर भाजपा आणि शिवसेनेत चर्चा सुरू असली तरी त्यावर तोडगा निघाला नसल्याने दोन्ही पक्षांनी सर्व प्रभागांसाठी मुलाखती सुरू केल्या आहेत. तसेच त्यातील कोणत्या उमेदवारांना मतदारांची पसंती आहे, याचे सर्व्हे सुरू ठेवले आहेत.
गुरुवारी शिवसेना (शिंदे) पक्षाने 227 प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली. रंगशारदा येथे सुरू असलेल्या मुलाखतीला 227 जागांसाठी 2700 इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली. तसेच या मुलाखतीसाठी मनसे आणि काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये, युती आणि आघाड्यांमध्ये जागावाटपाच्या बैठकांना वेग आला आहे. मात्र, जागा वाटपावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय रखडण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना नेते माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याबाबत बोलताना शेवाळे म्हणाले, आम्ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार आहोत. आमच्या पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र निवडणुकीत योग्य उमेदवार असावा यासाठी पक्षाकडून मुलाखती घेण्यात येत आहेत.
शिवसेना आणि भाजपमध्ये आतापर्यंत 150 जागांवर निर्णय झाला असून उर्वरित 77 जागांबाबत निर्णय घेतला जाईल. त्यात जी जागा पक्षाच्या वाट्याला येईल तिथे उमेदवार तयार असावा म्हणून या मुलाखती घेतल्या जात आहेत. तसेच काही जागा भाजप आणि शिवसेनेमध्ये अदलाबदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 227 जागांसाठी मुलाखती घेत असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी भाजपही सर्व प्रभागांसाठी मुलाखती घेत आहे. त्यामुळे युती झाली नाही तर दोन्ही मित्रपक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे.