BJP vs Shivsena Pudhari
मुंबई

Mahayuti Alliance Dispute : मित्रपक्षाच्या हव्यासापायी तीन जागा गमावल्या

शिंदे शिवसेनेला भाजपचे खडे बोल; धंगेकरांसारख्या झारीतील शुक्राचार्यांवर शिंदेंनी कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने आपल्याच मित्रपक्षांना अडचणीत आणले. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही. त्यामुळे महायुतीच्या तीन जागा गेल्या, या शब्दांत भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या भूमिकेवर हल्ला चढविला; तर, महायुतीधर्म झुगारून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या रवींद्र धंगेकरांसारख्या झारीतील शुक्राचार्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या निकालानंतर शिंदे गटाच्या नेत्यांच्या कारवाया आणि त्यासंदर्भातील पक्षाची भूमिका वादात सापडली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर निशाणा साधला. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीला सहकार्य केले असते तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले.

पुण्यामध्ये धंगेकरांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी भूमिका घेतली. संजय शिरसाट यांनीही असेच काही विधान केले होते. विजयासाठी आपल्या मित्रपक्षांना सहकार्य करायचे की दोघांचे भांडण करत तिसऱ्याचा लाभ होऊ द्यायचा याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण ५ जागा महायुती जिंकू शकत होती. महायुती म्हणून आत्मपरीक्षण करण्याची सर्वांना गरज आहे, असे बन म्हणाले.

महायुतीमध्ये पुण्याच्या जागेसाठी थोडासा समन्वय असता तर ती जागा भाजपने जिंकली असती; तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ऐनवेळी शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला. या मतदारसंघासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे होते. त्यांचा अर्ज मागे घेतला. पण ऐनवेळी शिवसेनेने सानप यांना पाठिंबा दिला.

याचा परिणाम झाला की, त्यांना १६ हजारांहून अधिक मते मिळाली; तर पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव ११ ते १२ हजार मतांनी पराभूत झाल्या. जे शिक्षक मतदारसंघात मतदार असतात, तेच पदवीधर म्हणूनसुद्धा मतदान करत असतात. ती मते जर भाजपला पडली असती तर स्मिता जाधव विजयी झाल्या असत्या, असेही बन म्हणाले.

धंगेकरांच्या भूमिकेचा अर्थ काय?

  • पुण्यात तर रवींद्र धंगेकर यांनी मतदारांना जाहीरपणे भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका, असे आवाहन केले. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करायला हवी.

  • धंगेकर हे शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत. ते जर पदवीधरांना आवाहन करत असतील की भाजपला मतदान करू नका तर हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर एकनाथ शिंदे कारवाई करणार का? अमरावतीमध्ये महायुती म्हणून आम्ही शिवसेनेला संपूर्ण मदत केली.

  • अमरावतीत बंडखोरी करणाऱ्यांना भाजपने तत्काळ सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेर काढले, तसेच शिस्तीचे पालन केले. याच धर्तीवर मित्रपक्षानेही कारवाई करावी, अशी मागणीही बन यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT