मुंबई : गौरीशंकर घाळे
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने राज्यभरात दमदार कामगिरी केली. बहुतांश महापालिकांमध्ये संख्याबळ भाजपच्या बाजूने असल्याने भाजप नेतृत्व निर्धास्त आहे. त्यातच, महापौरपदाची आरक्षण सोडत आणि पालिकेतील गटनोंदणी झाल्यावरच पुढील कार्यवाही शक्य आहे. त्यामुळे शिंदे गटाने प्रशिक्षणाच्या निमित्ताने नगरसेवकांना हॉटेलात ठेवणे असो अथवा ठाकरे गटाकडून होत असलेल्या राजकीय विधानाने भाजपच्या धोरणात बदल होणार नाही. शिवाय, कोणताही अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच पातळीवर होईल.
पालिकेतील विजयी कामगिरीनंतर ते स्वतः आर्थिक परिषदेसाठी दावोसला रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढील कोणताही निर्णय फडणवीस मायदेशी परतल्यावरच होईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यात मुंबईसह तब्बल 25 महापालिकांत भाजप स्वबळावर अथवा महायुतीतील आपल्या मित्रपक्षांच्या साथीने सत्तेवर येऊ शकतो. या सर्व महापालिकांतील संख्याबळ भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळेच भाजपचे नेतृत्व निर्धास्त आहे. नगरसेवक फुटण्याच्या शक्यतेने शिवसेना शिंदे गटाने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहेत, तर ठाकरे गटानेही महापौरपदाबाबत काहीही शक्य असल्याचे विधान करत राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईत शिवसेनेचा महापौर हवा, शिंदे गटाला अडीच वर्षांसाठी महापौरपद हवे असल्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. मात्र, दबावाचे राजकारण करून अधिकाधिक सत्तापदे पदरात पाडून घेण्यासाठी ही खेळी असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.
तसेच, सध्याच्या राजकीय दावे-प्रतिदाव्यांचा प्रत्यक्षात कोणताच परिणाम होणार नसल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. कोणताही वेगळा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेशिवाय शक्य नाही. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेसाठी रवाना झालेले फडणवीस आता पाच दिवसांनीच मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत कोणताही वेगळा निर्णय शक्य नाही. शिवाय, बहुतांश महापालिकांच्या निकालांची अधिसूचना सोमवारी जारी होणार आहे. ही अधिसूचना जारी झाल्यानंतर गटनोंदणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर, मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत ही येत्या 22 किंवा 23 जानेवारी रोजी होईल. त्यानंतरच, महापौर पद अथवा स्थायीसह विविध महत्त्वाच्या समित्यांबाबत निर्णय शक्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणतेच चित्र स्पष्ट होणे शक्य नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या घडामोडी आणि विधाने म्हणजे दबावतंत्राचा प्रकार आहे आणि या दबावतंत्रासमोर आता भाजप नेतृत्व झुकण्याची शक्यता नसल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
महापौरपदाबाबत विशेषतः मुंबईबाबत राजकीय विधाने सुरू आहेत. शिंदे गटाने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलात ठेवले आहेत, तर देवाच्या मनात असेल तर आपलाही महापौर होऊ शकतो, अशी भूमिका स्वतः उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. मात्र, भाजपला धक्का देण्याची कोणतीही राजकीय खेळी झाल्यास भाजप नेतृत्वाकडून त्याची पुरती परतफेड केली जाईल. कोणताही दगाफटका सहन करण्याच्या मन:स्थितीत भाजप नेतृत्व नाही. शिवाय, गटनोंदणीनंतर पक्षांतर बंदीच्या कारवाईची सारी सूत्रे प्रशासनाच्या हाती जाणार आहेत.राज्यांच्या प्रमुखांना डावलून कोणते राजकीय धाडस अंगलट येण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळेच इतर पक्षांचे नगरसेवक हॉटेलात असले तरी भाजपचे नगरसेवक मात्र निर्धास्त असल्याकडेही भाजपच्या वरिष्ठ नेत्याने लक्ष वेधले.