मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप तरुणांना प्राधान्य देणार आहे. या निवडणुकीत 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे 40 टक्के उमेदवार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.
वरळीच्या एनएनसीआय डोम येथे इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायट नेशन्स अर्थात आय.आय.एम.यू.एन. च्या युथ कनेक्ट या संवादसत्रात मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली पक्षांतरे आणि भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येत आहेत त्याबद्दल छेडले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकशाही दोन पद्धतीने चालते, एक विचारधारेने आणि दुसरी संख्याबळावर. तुमच्याकडे संख्याबळ नसेल, तर तुम्ही एखादी विचारधारा चालवू शकणार नाही.
प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकीत एक विचारधारा मांडली, पण मतदारांनी त्यांना कौल दिला नाही. अशा वेळी संख्याबळाशिवाय बदल घडवणे अशक्य आहे. शिवाय लोकांच्या दैनंदिन गरजेच्या विषयात विचारधारेचा फारसा संबंध येत नाही. त्यामुळे किमान समान कार्यक्रम राबविता येणे शक्य आहे. तरीही येत्या काही वर्षांत विचारधारा राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल, असे भाकीतही फडणवीस यांनी वर्तविलेे.
विधायक विरोध हा लोकशाहीचा पाया आहे. मात्र, घटनात्मक संस्थांना हानी पोहोचवणाऱ्या, अराजकतावादी मानसिकतेतून होणारा विरोध लोकशाहीचा कदापि विकास करू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.