Devendra Fadnavis file photo
मुंबई

Maharashtra Monsoon Session: आले, सही केली अन् निघाले... आता चालणार नाही! भाजप आमदारांसाठी बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक

Maharashtra Monsoon Session 2026: विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदारांना आता सही नाही, तर बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Monsoon Session 2026 BJP MLA

मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात भाजप आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, सभागृहात अनेक आमदारांची पूर्णवेळ उपस्थिती दिसत नसल्याने भाजप आमदारांना आता सही नाही, तर बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या आमदारांसाठी हा नवा निर्णय घेतला आहे.

आठवडाभरापासून घडणाऱ्या वेगवान राजकीय घटनाक्रमांमुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चर्चेत आले आहे. सोमवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजप आमदारांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील उपस्थिती, विविध मुद्द्यांवर आमदारांची झाडाझडती झाली.

त्यानंतर विधिमंडळ कामकाजात अधिकाधिक सहभागासाठी भाजप आमदारांना बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार रविंद्र चव्हाण यांनी समोर आणला आहे. त्यामुळे आमदारांकडून अधिवेशन काळातील हजेरी पद्धतीत बदल होणार आहे. प्रत्येक आमदार व मंत्री किती वेळ सभागृहातील कामकाजात सहभागी झाला, याची नोंद घेतली जाणार आहे. आमदारांनी आक्रमक पद्धतीने सभागृहात उतरण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलले असून लवकरच अंमलबजावणी होणार आहे.

सकाळच्या सत्रात विधानभवनात दाखल झालेले आमदार पुर्णवेळ सभागृहात नसतात, स्वतःच्या विषयापुरते हजेरी आणि अन्य वेळात आमदार इतरत्र गाठीभेटी करत असल्याचे चित्र मागील अधिवेशनात दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत आमदारांना सभागृहातील उपस्थिती वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करत पक्ष आणि सरकारची बाजू जोरकसपणे मांडण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत.

शेतकरी कर्जमाफीसह अनेक विषयात राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. विविध क्षेत्रांत महत्वाचे निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी सुरू आहे. या सर्वांचे प्रतिबिंब आमदारांच्या मांडणीतून उमटायला हवे. त्यासाठी कल्पकतेने मांडणी करण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT