राजेंद्र पाटील
नवी मुंबई : मुंबई, ठाणे महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले तरी नवी मुंबईबाबत अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे नवी मुंबई भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी सुरूच आहे.
भाजप नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबईतील इच्छुक 850 उमेदवारांच्या मुलाखती निवडणूकप्रमुख माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे, जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांनी घेतल्या. यामध्ये 381 तुल्यबळ उमेदवार आणि पदाधिकारी यांचा समावेश आहे. त्यातून छाननी करून अखेर 221 इच्छुक उमेदवारांची अंतिम यादी पक्षाच्या नेतृत्वाकडून पाठविण्यात आली. दरम्यान बुधवारी (17 डिसेंबर) भाजप प्रदेशाध्यक्षांनी नवी मुंबई भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी आणि निवडणुकीच्या प्रमुख पदी असलेले माजी खासदार संजीव नाईक यांना बैठकीसाठी बोलावले आहे.
भाजपत उमेदवारीसाठी प्रचंड चढाओढ दिसून येत असून नावावर शिक्कामोर्तब करताना नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. 111 जागांसाठी तब्बल 850 इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती भाजपचे निवडणूकप्रमुख संजीव नाईक यांनी दिली आहे. 28 प्रभागांतील 111 जागांसाठी हे अर्ज प्राप्त झाले. ओबीसी व खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक अर्ज आले. त्यामध्ये 300च्या वर महिलांचादेखील समावेश आहे.
यादी पक्षश्रेष्ठींकडे
भाजपने 850 इच्छुकांचे अ,ब,क असे वर्गीकरण केले. त्यामध्ये 381 इच्छुक आहेत. त्यात अ आणि ब अशी वर्गीकरण करून 221 इच्छुकांची यादी निश्चित केली. त्यामध्ये माजी नगरसेवक, माजी परिवहन सदस्य, शिक्षण मंडळ सदस्य, वृक्ष प्राधिकरण सदस्य आणि स्वीकृत नगरसेवक यांचा समावेश आहे. इच्छुकांच्या गर्दीमुळे बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा सामना पक्षाला करावा लागू शकतो. शिवसेनेसह इतर पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली.