BJP On Mumbai Bihar Bhawan: मुंबईत उभारण्यात येणाऱ्या 30 मजली ‘बिहार भवन’ प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. बिहार सरकारने या प्रकल्पासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर आता त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषतः मनसेने या प्रकल्पाला थेट विरोध केला असून, भाजपनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प मुंबईत परीक्षा, नोकरी, सरकारी कामकाज किंवा विशेषतः उपचारासाठी येणाऱ्या बिहारमधील नागरिकांसाठी उपयोगी ठरेल, असा दावा केला जात आहे. यासाठी बिहार सरकारकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकल्पाला विरोध केला आहे.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या बिहार भवनाला विरोध केला आहे. “बिहार भवन वगैरे काही आम्ही इथे बांधू देणार नाही,” असं म्हणत त्यांनी आक्रमक भूमिका मांडली.
किल्लेदार यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात आधीच अनेक गंभीर प्रश्न आहेत. शेतकऱ्यांवर अवकाळी संकट आहे, महागाई वाढत आहे, मुलांचं शिक्षण महाग होत आहे, तरुणांमधील बेरोजगारी वाढत आहे, अशा अनेक समस्या असताना, 314 कोटी रुपये खर्च करून बिहार भवन बांधण्यापेक्षा लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं, असं त्यांनी म्हटलं.
इतकंच नाही, तर त्यांनी बिहार सरकारलाही प्रश्न विचारला. 'बिहारमधून जे लोक मुंबईत उपचारासाठी येतात, त्यांच्यासाठी एवढे पैसे मुंबईत खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच मोठी हॉस्पिटल्स उभी करा, म्हणजे लोकांना बाहेर जायची गरज पडणार नाही. आमचे प्रश्न सुटत नाहीत आणि वर हे असे प्रकल्प डोक्यावर मारले जात आहेत. आम्ही बिहार भवन होऊ देणार नाही,” असा थेट इशाराच यशवंत किल्लेदार यांनी दिला.
मनसेच्या या भूमिकेला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, “देशात वेगवेगळ्या राज्यांची भवनं अनेक ठिकाणी असतात.”
भाजप प्रवक्ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन आहे, मग काश्मीरच्या लोकांनी त्याला विरोध करायचा का? उत्तर प्रदेशात अयोध्येतही महाराष्ट्र भवन आहे, तिथल्या लोकांनी विरोध केला का? मग महाराष्ट्रात बिहार भवन सुरू होत असेल तर त्यात गैर काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.