Ashish Shelar Pudhari
मुंबई

Ganesh festival safety: ‘कसूर आढळल्यास सोडणार नाही’; भुलेश्वरच्या दुर्घटनेनंतर शेलारांचा इशारा

प्रशासकीय कसूर आढळल्यास कोणालाही सोडणार नाही : सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची मूर्ती कोसळून झालेल्या अपघातानंतर आता गणेश आगमन मार्गांची पाहणी केली जाणार आहे. भुलेश्वर येथील दुर्घटनेच्या चौकशीत नेमकी कारणे समोर येतील आणि त्यानुसार जबाबदारी निश्चित होईल.

मात्र, भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी गणेश मंडळे, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. महापालिकेने येत्या २४ तासांत आगमनाच्या मार्गांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांवर कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी सांगितले.

महापालिकेने यापूर्वीही विविध बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. मात्र, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्व यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासकीय व्यवस्थेत कोणाचीही कसूर आढळल्यास संबंधित व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशाराही शेलार यांनी दिला.

भुलेश्वरचा राजा गणेशमूर्ती कोसळून मंडळाच्या अध्यक्षांसह दोन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मंत्री आशिष शेलार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत मृत्युमुखी पडलेल्या गणेशसेवकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, चंदनवाडी स्मशानभूमीत मृत्युमुखी पडलेले मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे आणि बृजेश जोशी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री शेलार म्हणाले की, या दुर्घटनेमागे नेमका दोष कोणाचा आहे आणि दुर्घटना कशामुळे घडली, हा चौकशीचा विषय आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. चौकशीतून सर्व बाबी स्पष्ट होतील. गणेशमूर्ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी ट्राॅली, चाकांची रचना, लोखंडी भाग तसेच त्यातून निर्माण होणारे कंपन याबाबत गणेश मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्व गणेशभक्त आणि मंडळांना माझी विनंती आहे की, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत

दुर्घटनेमुळे गणेशभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. या दुःखाच्या प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्याची भूमिका राहणार असून, जखमींवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना आवश्यक ती सर्व मदत आणि आर्थिक साहाय्य देण्यात येईल, तसेच त्यांनी वैयक्तिकरित्या ५ लाखांची मदत मृतांच्या नातेवाइकांना देणार असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेनीही घेतली भेट

शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील शनिवारी मध्यरात्री गिरगावच्या एचएन रिलायन्स रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. यावेळी रुग्णालयात दाखल जखमी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून गरज पडल्यास कार्यकर्त्यांना सर्वतोपरी मदत करू, असे आश्वस्त केले. यावेळी खासदार मिलिंद देवरा उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT