मुंबई पुढारी वृत्तसेवा : एका बाजूला महामुंबईत मेट्रोचे जाळे सर्वत्र विस्तारत असताना आता रस्तेमार्गे प्रवासही वेगवान होणार आहे. मुंबई ते ठाणे प्रवासाला गती देण्यासाठी १४ हजार कोटींचा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प उभारण्यात येत असून त्यातील जुळ्या बोगद्यांच्या कामाचे भूमिपूजन आज शनिवारी (दि.13) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. नेस्को सेंटर येथे संध्याकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचे जुळे बोगदे तयार केले जातील. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर असेल. हे बोगदे जमिनीखाली २० ते १६० मीटर खोलवर असतील. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील. सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने बोगद्याचे खोदकाम केले जाईल.
बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुविजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश असेल. पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या जलवाहिन्या यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था केली जाईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार व तुळशी तलाव यांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार. प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी पशूपथाची निर्मिती केली जाईल. प्रकल्पासाठी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेले नाही.
कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टनांनी घट होणे अपेक्षित आहे. जुळ्या बोगद्याच्या निर्मितीसाठी अपेक्षित एकूण खर्च ६ हजार ३०१ कोटी रुपये आहे. ऑक्टोबर २०२८पर्यंत जुळे बोगदे तयार होतील. बोगदा प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता, तळमजला अधिक २३ मजल्यांच्या ७ इमारती आणि तळमजला अधिक ३ मजल्यांची बाजार इमारतीची कामे प्रगतिपथावर आहेत.
हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित असून रस्त्याची एकूण लांबी १२.२० किलोमीटर असेल. पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या उड्डाणपुलाचे रुंदीकरण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात ३० मीटर रुंद रस्त्याचे ४५.७० मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाईल. तिसऱ्या टप्प्यात उड्डाणपूल आणि एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम केले जाईल. तसेच गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किमी लांबीचा तिहेरी मार्गिका असलेला पेटी बोगदा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जुळे बोगदे तयार केले जाणार आहेत.
चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली टोल नाक्यापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडणारा प्रस्तावित द्विस्तरीय उड्डाणपूल तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर वाहनांसाठी भुयारी मार्ग या कामांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटे होईल.