मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई बाहेरील मोठ्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्या फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने भिवंडी ते मोडकसागर वाय जंक्शनपर्यंत 3 हजार मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल 2,301 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या 15 दिवसात कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे 1,990 रुपये खर्च येईल, असे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया राबवली असता कंत्राटदाराने 5.67 टक्के पेक्षा जास्त दराने निविदा भरली. त्यामुळे जलवाहिनीच्या खर्चामध्ये 103 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबई शहराला वैतरणा खोऱ्यातील जल स्त्रोतापासून चार जलवाहिन्यांमार्फत गुंदवलीपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. तानसा ते गुंदवली या मार्गावर चार जलवाहिन्या वापरात असून गारगाई प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर या वाहिन्या पूर्ण क्षमतेने वापरण्यात येणार आहेत.
या जलवाहिनी फुटण्यामुळे आजूबाजूच्या भागात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गुंदवलीपर्यंत कोणत्याही जलवाहिनी दुरुस्तीचे काम करायचे असल्यास पर्यायी जलवाहिनी असणे आवश्यक आहे. जेणेकरून भांडुप जल शुद्धीकरण केंद्रास अखंडीत पाणी पुरवठा सुरु राहील. यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याचे जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.
वैतरणा जलवाहिनी (2400 मि.मी.) सन 1954 मध्ये तर अप्पर वैतरणा जलवाहिनी (2750 मि.मी.) ही सन 1972 मध्ये कार्यान्वित झाली आहे.
या दोन्ही जलवाहिन्यांची वयोमर्यादा अनुक्रमे 70 ते 50 वर्षापेक्षा जास्त आहे.
या जलवाहिन्या खूप जुन्या असल्याने पूर्ण वहन क्षमतेने वापर करता येत नाही. पाण्याच्या दाबाच्या वापरास मर्यादा येतात.