संजय भोईर
भिवंडी: राज्यात अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच गुरुवारी दुपारी भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे इमारती खाली खेळणाऱ्या सात वर्षीय चिमुरडीवर खाऊचे आमिष दाखवून फ्लॅट मध्ये नेवून तिच्यावर अत्याचार करण्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी सायंकाळी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अंकित गिरी वय १८ असे नराधम आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कशेळी येथील एका इमारतीमध्ये राहणारी सात वर्षीय चिमुरडी आपल्या दहा वर्षीय भावासोबत इमारती खाली खेळत असताना नराधम अंकित गिरी त्याठिकाणी येऊन या दोघांना खाऊचे आमिष दाखवत भावाकडे ५० रुपये पाणी आणण्यासाठी देऊन चिमुरडीस त्यांच्या इमारती पासून तीन ते चार बिल्डिंग लांब आपल्या भाड्याच्या खोलीत घेऊन गेला.
तेथे तिचे हात बांधून तोंड दाबून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. घरी परतल्या वर सायंकाळी चिमुरडीने ही बाब घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी नारपोली पोलिस ठाण्यात सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने तातडीने संशयित आरोपीचा शोध सुरू करून अवघ्या दोन तासात आरोपी अंकित गिरी याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनंतर कशेळी परिसरात संतापाची लाट उसळली असून त्यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्या बाहेर जमत आरोपीस कठोर शासन देण्याची मागणी केली आहे.