मुंबई महापालिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रभाग कोणता?  Pudhari Photo
मुंबई

BMC Election 2025: मुंबई महापालिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रभाग कोणता?

भेंडीबाजार 224 प्रभागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या! सर्वांत कमी लोकसंख्या गोरेगाव प्रभाग क्रमांक 51 मध्ये

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Municipal Election

मुंबई : मुंबई शहरातील 227 प्रभागांच्या हद्दी मुंबई महापालिकेने निश्चित केल्या असून यात भेंडी बाजार 224 प्रभागामध्ये सर्वाधिक 64 हजार 245 लोकसंख्या आहे, तर सर्वांत कमी लोकसंख्या गोरेगाव प्रभाग क्रमांक 51 मध्ये 45 हजार 463 इतकी आहे. अन्य प्रभागांमध्ये मात्र 46 हजार ते 63 हजारांपर्यंत लोकसंख्या आहे.

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेने शहर व उपनगरांतील 227 प्रभागांच्या हद्दी निश्चित केल्या असून यावर सुनावणीही झाली आहे. या हद्दी निश्चित करताना तेथील लोकसंख्येचा विचार करण्यात आला होता. पण कोणत्याच विभागात समान लोकसंख्या करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील मतदारांची संख्या ही कमी-जास्त प्रमाणात राहणार आहे.

भेंडीबाजार 224 प्रभागाची लोकसंख्या मुंबईतील अन्य 226 प्रभागांच्या तुलनेत जास्त आहे. प्रभाग पुनर्रचना करताना लोकसंख्या निश्चित करत असताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचाही विचार करण्यात आला आहे. प्रत्येक विभागात अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीचे लोक राहत असून ही संख्या प्रत्येक प्रभागात सरासरी 2 हजार ते 8 हजारांच्या घरात आहे.

दरम्यान कमीजास्त असलेल्या लोकसंख्येबद्दल माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. महापालिकेने हद्द निश्चित करताना लोकसंख्येचाही विचार करणे गरजेचे होते. परंतु लोकसंख्येचा विचार न करता केवळ हद्दीमध्ये काही प्रमाणात बदल करून, लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत ठेवली आहे. त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये प्रचार करताना लहान प्रभागांच्या तुलनेत खर्च जास्त येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या खर्चाचा मेळ बसवताना मोठ्या प्रभागातील उमेदवारांची दमछाक होणार असल्याचे माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT