मुंबई: मुंबई महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भातसा धरणातील पाणीसाठ्याच्या आकडेवारीतील गंभीर तफावतीबाबत जोरदार हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
भाजप नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रशासनाच्या अहवालांमधील विसंगत आकडेवारीकडे लक्ष छेडत, हा प्रकार चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट केले.
स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेल्या अधिकृत तक्त्यांनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अहवालानुसार भातसा धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९८.१३% (७,०३,५९४ द.ल.ली.) दर्शवण्यात आला होता.
तर १० ऑक्टोबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्याच्या अहवालानुसार, अवघ्या एका आठवड्यात भातसा धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी थेट ६९.२९% (६,८९,८७६ द.ल.ली.) अशी घसरल्याचे दाखवण्यात आले आहे.
पालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी
या पार्श्वभूमीवर बोलताना तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रशासनाला सवाल केला की, ही केवळ छपाईची चूक आहे? की धरणातून मोठी पाणीगळती होत आहे, अथवा प्रशासनाकडून पाणीसाठ्याची खरी माहिती लपवली जात आहे? प्रशासनाने यावर तात्काळ स्पष्टीकरण देऊन मुंबईकरांना आणि स्थायी समितीला योग्य व अचूक माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.