मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेतही दिले आहेत. यामुळे ठाकरे गटातील नेत्यांचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांची भास्कर जाधव यांच्याविषयीची X वरील पोस्ट चर्चेत आली आहे. 'महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का?' असा सवाल त्यांनी केला आहे. या सर्व घडामोडीवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
''माझ्या कार्यालयाचा बोर्ड आणि एकूणच स्वरुप बघितलं तर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाराज आहे की नाही, हे जे कोणी आरोप करत आहे हे त्यांना कळलंच नसेल आणि कळणारच नसेन. त्याबाबत मी वारंवार खुलासा करुन काहीही फायदा होणार नाही. वैभव नाईक यांच्याशी बोलणे झाले आहे. पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांशी बोललो. कोकणात ठाकरेंची शिवसेना ताकदीने उभी आहे. पण शिवसेनेला भक्कम, लढवय्या आणि निर्भिड नेतृत्त्वाची गरज आहे.'' असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. मी नाराज नाही. अनेकदा स्पष्टीकरण दिलंय, असाही त्यांनी खुलासा केला.
कोकणातील लोक माझ्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जबाबदारीचे नेतृत्व म्हणून बघत असतील तर माझी जबाबदारी वाढलेली आहे. माझ्यामुळं रामदास कदम यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या वागण्यात, विचारांत बदल झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे. म्हणून मी रामदास कदमांना हेच सांगेन की आता त्या काळ्या जादू, बंगाली जादू याच्या भानगडी ऐवजी आता तुम्हीसुद्धा आता तुम्ही सन्मार्ग पत्करावा. रामदास कदम हा हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे. रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष मी देत नाही, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
संदीप देशपांडे यांच्या वक्तव्याला संजय राऊत उत्तर देतील. जे थांबणार नाहीत ते जातील, हे माझ्याबद्दल संजय राऊत बोललेले नाहीत, असे जाधव म्हणाले.
सध्या भ्रष्ट राजकीय कारभार सुरु आहे. प्रचंड भ्रष्टाचाराचा पैसा वापरून आपले उमेदवार उभे करून निवडणुका जिंकायच्या. तिथही यश आलं नाही तर तिथले लोकांना पैशाने विकत कसे घ्यायचं? हे नवीन फॅड देशात आणि राज्यात सुरु झालं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यांशी एकनिष्ठ राहिले. ते शिंदे यांच्यासोबत गेले नाहीत. दरम्यान, भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यास ठाकरे गटातील आमदारांनी विरोध केला होता. तसेच कोकणात माजी खासदार विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात संघर्ष आहे. तसेच जाधव यांना मातोश्रीवरील महत्त्वांच्या बैठकांना बोलविले जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.