शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिल्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांचा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. संजय राऊत, विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीबद्दल जाधव यांची नाराजी असून ती उफाळून आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर मात्र भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यांशी एकनिष्ठ राहिले. त्याची पोचपावती म्हणून भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारसपत्र उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हजर होते. परंतु शिंदे गट आणि भाजपचे नारायण राणे यांनी जाधव यांना विरोध केला, त्यामुळे त्यांचे विरोधी पक्षनेतेपद लटकले आहे. यामुळे भास्कर जाधव नाराज आहेत. त्यातच जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यास मुंबईतील ठाकरे गटाच्या आमदारांनी विरोध केला होता. सुनील प्रभू यांना विरोधी पक्षनेतेपद द्या, अशी त्यांची मागणी होती. परंतु आदित्य ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारसपत्र दिले. त्यामुळे पक्षातील धुसफूस हा त्यांच्या नाराजीचा विषय आहे.
दुसरीकडे, कोकणातील माजी खासदार विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात संघर्ष आहे. कोकणातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्यांमध्ये राऊत यांचा हस्तक्षेप असतो. जाधव यांना आपल्या मुलाला चिपळूण किंवा गुहागर मधून आमदार करायचे आहे. त्यासाठी त्यांनी मुलासाठी चिपळूणची जागा मागितली होती. जाधव हे शिवसेना नेते असताना त्यांना मातोश्रीवरील महत्त्वाच्या बैठकांना बोलविले जात नाही, हेही भास्कर जाधव यांच्या नाराजीचे कारण आहे.
भास्कर जाधव हे आक्रमक आहेत. पण खासदार संजय राऊत हेच पक्षाचे धोरण जाहीर करत असतात. त्यामुळे जाधव यांचा संजय राऊत यांच्याशी सुप्त संघर्ष आहे. त्यात जाधव यांच्याबद्दल संजय राऊत यांनी वक्तव्ये केल्यामुळे जाधव खवळले आहेत.
आठ वेळा आमदार राहिलेले भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते व्हायचे आहे. विधानसभेत विरोधी बाकावर ठाकरे गटाचे आमदार जास्त असल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेत ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्याची मुदत आता संपत आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या सतेज पाटील यांना दिले जाईल, असे आघाडीत ठरले आहे.
मात्र विरोधी पक्षनेतेपद देण्याचे सरकार पातळीवर काही ठरलेले नाही. विधानसभेत आवश्यक संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेतेपद देण्याचे अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री नितेश राणे यांचा विरोध असल्याने आगामी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेधनातही जाधव यांना हे पद मिळण्याची खात्री नाही.
महाविकास आघाडीने भास्कर जाधवांसाठीचे पत्र दिले नसल्याचे म्हटले जाते, मात्र ज्या पक्षाचा दावा तोच पक्ष या पदासाठीचे पत्र देतो. यापूर्वी काँग्रेसने जसे पत्र दिले तसेच आता ठाकरेंच्या शिवसेनेनेही विरोधी पक्षनेतेपदासाठीचे पत्र दिले आहे. फैसला मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाती आहे. तो ते कधी देतात यावर भास्कर जाधव यांचे विरोधीपक्षनेते होणे किंवा न होणे अवलंबून राहील.