मुंबई ः गिरणी कामगार आणि समस्त मराठमोळ्या संस्कृतीचे साक्षीदार असलेले लालबाग - परळ मधील मराठी चित्रपटगृहांचे माहेरघर असलेले भारतमाता सिनेमागृह 6 वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांसाठी खुले झाले आहे. दक्षिण मुंबईतील प्रेक्षकांना मध्यवर्ती ठरणार असल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटगृहाचे स्वागत केले आहे.
मुंबईतील गिरणगाव आणि मराठी संस्कृती एकवटलेल्या लालबाग, परळ, काळा चौकी, भोईवाडा, भायखळा, सात रस्ता, लोअर परेल या भागातील ज्या काही मराठी खाणाखुणा आहे, त्यातील एक भारतमाता सिनेमा होती. 1941 ला सुरू झालेल्या या एकपडदा चित्रपटगृहाचे नाव लक्ष्मी होते.
कालांतराने त्याचे भारतमाता हे नाव झाले. पण दक्षिण मुंबईतीलच नाही तर मुंबईतील तमाम मराठीजनांचे पाय मराठी चित्रपट पाहण्यासाठी या चित्रपटगृहाकडे वळत. त्यामुळे दादा कोंडके यांचे सर्व चित्रपट आणि माहेरची साडी सारखे असंख्य चित्रपटांनी हाऊसफुल्ला गल्ला दिलाच.
काही चित्रपटांना 100 दिवस पाहण्याचे भाग्यही लाभले. मराठी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार असलेल्या 2018 पासून हे चित्रपटगृह बंद होते. वातानुकुलित यंत्रणा, 409 आसन क्षमता, आरामदायी सीट्स, अत्याधुनिक, असलेले हे चित्रपट मुक्ता वन -2 आणि वन सिनेमाज यांनी या चित्रपगृहाचे नव्या रूपात प्रेक्षकांसाठी खुले केले आहे.
गिरणगावाच्या तीन पिढ्यातील प्रेक्षकांना रिझविणारे हे चित्रपटगृह नव्या रूपात लाभले आहे.मल्टीफ्लेसच्या तुलनेत तिकिटांचे माफक दर आणि खाद्य पदार्थांचे माफक दर असल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केलाच, पण या चित्रपटाबद्दल आम्हांला आपुलकी आणि आस्था असल्याची भावना पहिल्या दिवशी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.