कुर्ला : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठीकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत आहेत. शनिवारी (दि.04) दुपारी अशाच प्रकारे भांडूच्या एलबीएस मार्गावर सुरू असलेल्या एका इमारतीच्या खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणात रस्ता खचला आहे. परिणामी एलबीएस मार्गावर सध्या मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
एलबीएस मार्गावरील एशियन पेंट कंपनी समोर गेल्या काही महिन्यांपासून एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोल खोदकाम करण्यात आले आहे. परिणामी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास खोदकाम करण्यात आलेल्या परिसराचा मोठा भाग अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र याठिकाणी काही लोखंडी केबिन आणि तीन ते चार झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एलबीएस मार्गाला लागूनच ही घटना घडली असून घटनेच्या काही अंतरावर एक बेस्ट बसचा थांबा आहे. मात्र या घटनेच्या वेळी याठिकाणी कोणीही नसल्याने कोणालाही दुखापत झालेली नाही. त्यातच एलबीएस मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. मात्र जमीन खचत असल्याचे लक्षात येताच या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे मोठी हानी टळल्याची माहिती एका स्थानिकाने दिली आहे.