‌Bhabha Hospital Pudhari
मुंबई

‌Bhabha Hospital: ‘भाभा‌’तील लॅब टेक्निशियन्सच्या पात्रतेवर प्रश्न

महापालिका आयुक्तांना मानवाधिकार आयोगाने बजावले समन्स

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कार्यरत असलेल्या 13 लॅब टेक्निशियन्सविरोधात गंभीर आरोप समोर आले असून, ते आवश्यक नोंदणीशिवाय काम करत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाखल झाली आहे. या प्रकरणाची दखल घेत आयोगाने महापालिका आयुक्तांना समन्स बजावत 28 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र परिचारिका आणि पॅरावैद्यक व्यावसायिक (पॅरामेडिकल) परिषद अधिनियम, 2011 नुसार राज्यातील सर्व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नोंदणी अनिवार्य आहे. मात्र, तक्रारदार ॲड. तुषार भोसले यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, भाभा रुग्णालयातील 13 टेक्निशियन्स नोंदणीशिवाय कार्यरत असल्याचा दावा केला आहे.

नोंदणी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल हाताळले जात असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, तसेच हा मानवाधिकारांचा भंग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आयोगाचे कडक निर्देश

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाच्या सदस्या न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी महापालिका आयुक्तांना 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कोर्ट क्र. 2 मध्ये प्रत्यक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि चौकशी अहवालाच्या दोन प्रती सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

कारवाईची मागणी प्रलंबित

या संदर्भात तक्रारदाराने यापूर्वी रुग्णालय प्रशासन आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे पाठपुरावा केला होता. कौन्सिलच्या निबंधकांनीही महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून नोंदणी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर प्रकरण मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT