मुंबई: बेस्टच्या १२ संघटनांनी विविध मागण्यांसाठी तीन दिवसांपासून पुकारलेला संप रविवारी रात्री मागे घेतला. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना ३ हजार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना २ हजार रुपये मासिक हंगामी वाढ तसेच प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने केली.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सह्याद्री अतिथी गृहावर रविवारी सायंकाळी बैठक घेतली.
बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीस आमदार सचिन अहिर, आमदार मुरजी पटेल, उपमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, तसेच बेस्ट कर्मचारी कृती समितीचे सदस्य नितीन नांदगावकर, संयुक्त कामगार समितीचे सहयोजक ॲड. उदय आंबोणकर, विलास पवार आदी उपस्थित होते.
येत्या १५ दिवसांत इतर प्रलंबित मागण्यांसाठी काम केले जाणार आहे. तसेच कँटीन, वॉशरूममध्ये सुधार, बेस्ट स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न, बेस्टचा महसूल वाढवण्याचा प्रयत्न, बेस्ट कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करणार अशी आश्वासने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
९ ते १० कोटींचा महसूल बुडाला
तीन दिवसांपासून १९,२४५ चालक आणि १५,२७५ वाहकांनी काम बंद आंदोलन करत सहभाग घेतला तर २ हजार ७८८ बसेस पैकी फक्त ५२ बसेस रस्त्यावर धावल्या. त्यामुळे बेस्टच्या २५ लाख प्रवाशांचे तीन दिवस हाल झाले. जवळपास तीन दिवसांचा ९ ते १० कोटींचा महसूल या संपामुळे बुडाला.
दरम्यान, या संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी चर्चा केली होती. मात्र, या बैठकीत ज्या ज्या चर्चा झाल्या त्यांना प्रशासनाकडून बगल देण्यात आल्याचा आरोप समितीचे सयोजक ॲड. उदयकुमार आंबोणकर यांनी केला होता.
संपामुळे काही कामगारांना 'मेस्मा' अंतर्गत नोटिसा काढण्यात आल्या आहेत. तसेच कायदा हातात घेत सार्वजनिक ठिकाणी आगारांसमोर आंदोलन केल्यामुळे गुन्हे दाखल केले.
तीन दिवसात फक्त ५२ बसेस कार्यरत
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बेस्टच्या स्वतःच्या २४६ गाड्या आणि कंत्राटी २५२१ अशा एकूण २,७६६ बसेस गाड्या आहेत. गेल्या तीन दिवसात फक्त ५२ गाड्या रस्त्यावर होत्या.
बेस्टचे स्वतःचे २५७२ चालक आहेत. शिवाय कंत्राटी ५७०८ चालक आहेत. त्यापैकी रविवार फक्त ३३ बेस्टचे स्वतःचे आणि १३ कंत्राटी बसचे चालक कामावर होते.
शिवाय ३७६० बेस्ट आणि १३५९ कंत्राटी अशा ५ हजार ११९ कंडक्टर पैकी फक्त ६ कंडक्टर कामावर होते. जवळपास १९, २४५ चालक आणि १५,२७५ कंडक्टर कामगारांनी तीन दिवसाच्या संपात पूर्णपणे सहभाग घेतला.
रविवारी 'नीट' परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाने परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था म्हणून मुंबईतील ६३ परीक्षा केंद्रांवर ६० अतिरिक्त एसटी बसेस सोडल्या होत्या.
रविवारी रिक्षा-टॅक्सी साठी धावाधाव
घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना रविवारी रिक्षा-टॅक्सी मिळवताना नाकेनऊ झाले. स्टॅण्डवर लागलेल्या रांगा पाहून अनेकांचे डोळे फिरले. दादर मार्केट, दादर पूर्व स्वामी नारायण मंदिर,सांताक्रूझ, गोरेगाव, मालाड, लोखंडवाला अशा गर्दीच्या ठिकाणी रिक्षा-टॅक्सीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चालकांनी मनमानी भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशः लूट केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
बेस्ट बससेवा तत्काळ सुरू करावी.
कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्यात यावी.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ५००० नवीन बसेस स्वतःच्या मालकीच्या घेण्यात येतील. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद.
बेस्ट प्रशासनाने तयार केलेला 'कायापालट' प्रस्ताव
तातडीने शासनास सादर करून त्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल.