मुंबई : भाजपा-शिवसेना महायुतीच्या वाटपामध्ये बेस्ट समिती अध्यक्षपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता असून तृष्णा विश्वासराव यांना समितीचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्या बेस्टच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरणार आहेत.
मुंबई महापालिका सभागृहात बेस्ट समितीच्या सदस्यांची नावे महापौर रितू तावडे यांनी घोषित केली. महापालिकेत भाजपा-शिवसेना महायुतीची सत्ता आल्यामुळे चार वैधानिक समित्यांपैकी बेस्ट समिती शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. बेस्टमध्ये शिवसेनेचे दोन सदस्य गेले असून यात ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव, उपेंद्र सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सावंत हे बिगर नगरसेवक असल्यामुळे त्यांना अध्यक्षपदी विराजमान होता येणार नाही.
मात्र विश्वासराव नगरसेवक असल्यामुळे त्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. त्यामुळे बेस्टचा 1947 पासूनचा इतिहास लक्षात घेता विश्वासराव या पहिल्या महिला अध्यक्ष ठरू शकतील. आतापर्यंत शरद आचार्य, नारायण राणे, विठ्ठल चव्हाण, गणपत कदम, अरविंद नेरकर असे अनेक ज्येष्ठ नेते बेस्ट समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. नारायण राणे आमदार असतानाही बेस्ट समितीचे अध्यक्ष होते.
बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी बुधवार 18 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी बेस्ट समितीचा अध्यक्ष कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पण समिती अध्यक्षपदाची निवडणूक सोमवार 23 फेब्रुवारी रोजी बेस्ट भवन येथे पार पडणार आहे.