बेस्ट बसेस pudhari photo
मुंबई

BEST bus route changes : बेस्टच्या 23 बस मार्गांमध्ये मोठे बदल

वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीएसएमटी ए-207चा नवीन मार्ग सेवेत येणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अपुरा बसचा ताफा, प्रवाशांची मागणी आणि शहरातील अनेक ठिकाणांवरील वाहतूक बदल या सगळ्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने आपल्या बस मार्गात मोठे फेरबदल केले आहेत. शनिवार (दि. 1) पासून 23 पुनर्रचित मार्गांवर बस धावणार असून, आठ मार्गांवरील बसचे एसी बसमध्येही रुपांतर केले आहे. शिवाय, वर्ल्ड ट्रेड सेंटर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हा ए-207 बस क्रमांकाचा नवीन बसमार्गही सुरू केला आहे.

यामुळे गर्दीच्या वेळी बेस्ट बसची मेट्रो स्थानक, प्रमुख रेल्वे स्थानक आणि व्यावसायिक केंद्रांशी प्रभावीपणे जोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो आणि रेल्वेमधून प्रवास झाल्यानंतर तत्काळ बसमधून इच्छितस्थळी जाता येईल. त्याचा मोठा फायदा विद्यार्थी, कर्मचारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.

पूर्व उपनगरात बेस्टचे जाळे सक्षम होणार

गोरेगाव, दिंडोशी, ठाणे लिंक रोड, विक्रोळी, घाटकोपर-अंधेरी, भांडुप व मुलुंड परिसरातील बसमार्गाचा विस्तार केल्याने पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी प्रवासी सुविधा अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे प्रवासीसंख्येत वाढ होईल, अशी आशा बेस्ट प्रशासनाला आहे.

वातानुकूलित बसमार्गांत झालेले फेरबदल

  • ए-207- मालवणी आगार ते दहिसर बसस्थानक

  • ए-211-वांद्रे बसस्थानक ते फादर अँग्नेल आश्रम

  • ए-215-वांद्रे रेक्लेमेशन ते टाटा वसाहत

  • ए-399-ट्रॉम्बे ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)

  • ए-410-विक्रोळी आगार ते महाकाली गुंफा

  • ए-604-नागपाडा स्थानक ते महाकाली मुहा

  • ए-605-भांडुप स्टेशन ते टेम्भीपाडा

  • ए-606-भांडुप स्टेशन ते अशोक केदारे चौक

ए-207 मार्ग

  • बेस्टने वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीएसएमटी हा नवा मार्ग सुरू केला आहे. हा मार्ग जी. डी. सोमानी मार्ग, कुलाबा मार्केट, बेरेक नं.1, नवी नगर, सह्याद्री नगर, एल्फिन्स्टन ब्रीज, दादर, प्रभादेवी, महालक्ष्मी, हाजी अली, पेडर रोड, गिरगाव चौपाटीमार्गे सीएसएमटी ही बस धावेल. खासगी, सरकारी आणि विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना या बस मार्गाचा फायदा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT