मुंबई : सीएसएमटी ते एनसीपीए अथवा फ्री प्रेस जर्नल जाणाऱ्या 115 व 111 क्रमांकाच्या बेस्ट बसचा प्रवास मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी आरसा गेटसमोर अर्धवट संपवण्यात येत आहे. त्यामुळे नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सीएसएमटी नरिमन पॉईंट, एनसीपीए व फ्री प्रेस जर्नलदरम्यान 115 व 111 या क्रमांकाच्या बेस्ट बस धावतात. सकाळच्या वेळेत सीएसएमटी ते नरिमन पॉईंटदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात, तर सायंकाळी नरिमन पॉईंट ते सीएसएमटीदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते.
नरिमन पॉईंट येथून निघणाऱ्या या बस सीएसएमटीला प्रवाशांना उतरवल्यानंतर पुन्हा खादी ग्रामोद्योग या बस थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना घेऊन नरिमन पॉईंट अथवा फ्री प्रेस जर्नलकडे परत जातात. या बसमध्ये चर्चगेट, मंत्रालय, विधानभवन एनसीपीएला जाणारे प्रवासी असतात.
या बस मंत्रालय आरसा गेटजवळ आल्यानंतर त्यांचा प्रवास अचानक संपवण्यात येतो. बसमधील प्रवाशांना उतरवून बाहेरील बस स्टॉपवर उभे असलेल्या प्रवाशांना घेऊन ही बस पुन्हा सीएसएमटीच्या दिशेने रवाना होते.
प्रवाशांचा त्रास दूर करा!
13 ऑक्टोबरला सीएसएमटी ते फ्री प्रेस जर्नलकडे सायंकाळी सहाच्या सुमारास जाणाऱ्या 111 क्रमांकाच्या बसचा प्रवास आरसा गेटजवळ संपवण्यात आला. या बसमधील प्रवाशांना चर्चगेट ते फ्री प्रेस जर्नल 100 नंबर बसमध्ये बसवण्यात आले. विशेष म्हणजे शंभर नंबर बस पूर्णपणे नॉन एसी असताना, एसीचे बारा रुपये तिकीट घेतलेल्या प्रवाशांना नॉन एसीमधून प्रवास करण्यास भाग पाडले. बेस्ट अधिकाऱ्यांच्या अशा नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा त्रास दूर करावा, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.