मुंबई : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या बेस्ट ग्राहकांकडून थकीत बिले वसूल करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने पुन्हा 'अभय योजना-२०२६' चा प्रस्ताव बुधवारी बेस्ट समितीसमोर सादर केला. सभागृहातील चर्चेनंतर समितीने त्याला मंजुरी दिली. दरम्यान वर्ष २००९ पासून सुरू असलेल्या अभय योजनेत १६ हजार ग्राहकांनी बेस्टचे जवळपास ३९ कोटी रूपये थकविले आहेत. त्यापैकी फक्त १०.६२ कोटी रूपये प्रशासनाने वसूल केले आहेत. दक्षिण आणि मध्य मुंबईतील बेस्टचे हे ग्राहक आहेत.
बेस्ट वीज ग्राहकांच्या अर्जावर कार्यवाही करण्यात होणारा प्रशासकीय विलंब टाळण्यासाठी आणि थकीत महसुलाच्या वसुलीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने वर्ष २००९,२०१८,२०१९,२०१३ आणि २०२४ मध्ये अभय योजना राबविण्यात आल्या होत्या. त्यापैकी २०१८ मध्ये थकबाकीची सर्वाधिक २ हजार ४१५ प्रकरणे असताना बेस्टने फक्त ४.९९ कोटी वसूल केले आहेत.
शिवाय वर्ष २०१८ ते २०१४ दरम्यान ३ हजार ९०२ प्रकरणात फक्त १०.६२ कोटी वसूल केले आहेत. या वाढत्या थकबाकीकडे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच सदस्य सुनील अहिर यांनी ही एवढ्या कोटींचा महसूल फक्त थकबाकीमुळे रखडलेला आहे. तेव्हा बेस्ट प्रशासनाने व्यावहारिक दृष्टीकोनातून याकडे पाहून वसुली करावी, अशी सूचना केली. या अभय योजनेमुळे ग्राहकांना थकीत बिल भरणे शक्य होत आहे. त्यामुळे अभय योजनेची माहिती सोशल मीडिया आणि प्रेसच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे सांगत बेस्ट समिती सदस्य तृष्णा विश्वासराव यांनी या अभय योजनेला मान्यता दिली.
लाईट मीटर कापलेल्यांसाठी पुन्हा अभय योजना
बेस्टच्या ज्या वीज ग्राहकांचे लाईट मीटर १ ऑक्टोबर २००६ ते ३० जून २०२३ दरम्यान खंडित करण्यात आलेले आहेत. त्या वीज ग्राहकांना या अभय योजनेचा फायदा १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या तीन महिन्याच्या कालावधीत घेता येणार आहे. व्याज आणि विलंब शुल्क माफी पूर्णपणे माफ केली जाते. सर्व श्रेणींमधील ग्राहकांसाठी ही योजना लागू होते. तसेच नवीन वीज जोडणीची संधी या माध्यमातून मिळते.